बेकायदा मांगुर प्रकल्प बंद पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांची स्पष्ट भूमिका
अक्कलकोट : पाणी म्हणजे जीवन
आहे आणि हेच पाणी जर दूषित करून तालुक्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असेल तर ते अजिबात खपवून घेणार नाही,अशी स्पष्ट भूमिका माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी
घेतली. हे कृत्य बेकायदेशीर आहे ते याचा छडा लावल्याशिवाय गप्प राहणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला.
गेल्या आठवड्यापासून अक्कलकोट शहर आणि तालुक्यात दूषित पाणी आणि कुरनूर धरणालगत सुरू असलेल्या बेकायदा मांगुर प्रकल्प याविषयी जोरदार चर्चेला ऊत आला होता. या पार्श्वभूमीवर म्हेत्रे यांनी या बेकायदा प्रकल्पाची पाहणी करून संबंधितांकडून सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर आपली भूमिका तालुक्यासमोर स्पष्ट केली.
पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की,उद्या जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासोबत बैठक होणार आहे.या बैठकीमध्ये या प्रकल्पाची सविस्तर माहिती त्यांना दिली जाईल.यामुळे तालुक्यातील लाखो जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.याकडे कुणाचेही लक्ष नाही.वास्तविक पाहता गेल्या पाच-सहा वर्षापासून हा प्रकल्प सुरू आहे ते फार गंभीर आहे. याकडे कोणाचेच कसे काय लक्ष नाही,असा सवाल व्यक्त करून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.तसेच चाललेला प्रकार हा गंभीर असून तो हाणून पाडणे गरजेचे आहे.
मुळात दूषित पाणी केवळ हे अक्कलकोट शहर नव्हे तर तालुक्यातील ५१ गावांना तसेच दुधनी, मैंदर्गी या शहराला देखील पाणी पुरवठा होत आहे.हा प्रकार भयानक आहे.माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर स्थानिक प्रशासनाने बंदीची कारवाई केली आहे.परंतु ती तात्पुरत्या स्वरूपात दिसत असल्याने भविष्यात असा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कायमस्वरूपी या प्रकल्पाचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही उद्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. त्या भेटीदरम्यान आम्ही प्रकल्प पूर्ण उद्ध्वस्त करा अशा प्रकारची भूमिका मांडणार आहोत तसेच आता पर्यंत सुरू असलेल्या या बेकायदा मांगुर प्रकल्पाची सखोल चौकशी करण्याची मागणी आम्ही प्रशासनाकडे करणार आहोत, असेही ते म्हणाले.
पंचायत समितीचे सभापती
आनंदराव सोनकांबळे म्हणाले की,सध्या कुरनूर धरणातून पुरवठा होत असलेले पाणी खूपच दूषित आहे आणि ते आरोग्यास घातक आहे आणि या माशांवर हरित लवादाची बंदी आहे.याचे पालन आणि उत्पादन व विक्री या तिन्ही गोष्टींवर देशात बंदी असताना असा प्रकार सुरू आहे,असे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे,कुरनूर धरण संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, सरपंच व्यंकट मोरे,माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण जाधव,चुंगीचे राजू चव्हाण, तुकाराम दुपारगुडे,प्रदीप वाले, विजय कांबळे,सोमनाथ खैराटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
◆ दोषींवर कठोर कारवाई करा
हा प्रकल्प कोणी का सुरू करेना.हे सहन न होणारे आहे.त्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.जर त्यांनी उध्वस्त नाही केले तर आपण करू. हा लोकांच्या जीवन मरणाचा विषय आहे.हा प्रकल्प पूर्णपणे उध्वस्त झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार
नाही, असा इशारा म्हेत्रे यांनी दिला.