ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तुळजाभवानीला गाळपासाठी परिपक्व ऊसच पाठवा : मधुकरराव चव्हाण यांचे आवाहन, गळीत हंगाम कार्यक्रम उत्साहात

अक्कलकोट, दि.२८ : कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठ्या कष्टाने सुरू केला आहे याची जाण ठेवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीही तुळजाभवानी कारखान्याला चांगला परिपक्व झालेला ऊसच पाठवावा, असे आवाहन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी नळदुर्ग येथे बोलताना केले.

नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याने तुळजाभवानी कारखाना पंधरा वर्षे भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतला आहे. याप्रसंगी गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे, तुळजाभवानी युनिटचे प्रमुख सुनील चव्हाण, जि.प सदस्य बाबुराव चव्हाण यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

प्रारंभी जि.प सदस्य चव्हाण यांनी कारखाना सुरू करण्यासाठी दत्ता शिंदे आणि सुनील चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. गोकुळ शुगरचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर कपिल शिंदे , जिप सदस्य मुकुंद डोंगरे , कारखान्याचे माजी संचालक अशोकराव मगर , उस्मानाबाद जि प चे माजी उपाध्यक्ष उल्हास बोरगावकर,  गोकुळ शिंदे , शहबाज काझी,  काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुभद्राताई मुळे यांनी तुळजाभवानी कारखाना सुरू होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.यावेळी बोलताना माजी मंत्री चव्हाण म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून तुळजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची परवड होत होती तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत असताना गाळपाची व्यवस्था नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते काही कारखान्यांनी ऊस घेतला परंतु शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत शेतकऱ्यांची ही दयनीय अवस्था पाहवत नव्हती त्यामुळे आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळेल.

या कार्यक्रमास शिवयोगी शिवाचार्य महाराज (अणदूर), तुकोजी बुवा , काँग्रेसचे नेते अशोकराव पाटील ( जळकोट) , मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे , नगरसेवक अख्तर काझी यांच्यासह तुळजापूर तालुक्यातील काँग्रेसचे नेते , कार्यकर्ते , ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी कारखान्याचे कार्यकारी संचालक विकास भोसले यांनी आभार मानले.

◆ भगवान शिंदे यांची स्वप्नपूर्ती

दहा वर्षापासून तुळजा भवानी कारखाना बंद स्थितीत आहे. गोकुळ शुगरचे तत्कालीन चेअरमन स्व भगवान भाऊ शिंदे यांना हा कारखाना सुरू व्हावा असे मनोमन वाटत होते. याबाबत त्यांनी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, सुनील चव्हाण यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली. मात्र त्यांच्या हयातीत कारखाना सुरू करता आला नाही. आज भगवानभाऊचे स्वप्न साकार करता आले, याचा आनंद वाटतो अशी प्रतिक्रिया गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!