दिल्ली : रिलायन्स जिओनंतर आता दिग्गज अमेरिकन टेककंपनी गुगलने टेलिकॉम ऑपेरटर कंपनी भारती एअरटेलमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी गुगल तब्बल ७, ५०० कोटी रुपये (१ बिलीयन अमेरिकन डॉलर) गुंतवणूक करणार असल्याची माहिती भारती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी दिली आहे. या आधी गुगलने मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओमध्ये जुलै २०२० मध्ये ३७,७३७ कोटी रुपये (४.५ बिलीयन अमेरिकन डॉलर) गुंतवणूक केली होती.
गुगलने भारती एअरटेलमध्ये गुंतवणूक करण्यासह कंपनीचे १.२८ टक्के भागिदारीही खरेदी केली आहे. यासाठी या अमेरिकन कंपनीने ५२५ कोटी रुपये (७० कोटी अमेरिकन डॉलर) मोजले असून कंपनीला एक शेअर ७३४ रुपयांना पडला आहे. या डीलमुळे शुक्रवारी शेअर मार्केटमध्ये भारती एअरटेलचा शेअर जवळपास दोन टक्के पळाला होता. दरम्यान, या पैशांद्वारे गुगल भारती एअरटेलच्या मदतीने भारतामध्ये स्वस्त स्मार्ट फोनची निर्मिती आणि ५ जी तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी काम करणार आहे.