अक्कलकोट, दि.१ : देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील विविध मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण बघूयात. या अर्थसंकल्पाचे संमिश्र प्रतिसाद तालुक्यात उमटले आहेत.
◆ अर्थसंकल्पातून सर्व वर्गाची घोर निराशा
मोदी सरकारने बजेटमधून मोठमोठे आकडे फेकून भव्य दिव्य स्वप्न दाखवली आहेत. गुलाबी स्वप्नांशिवाय सर्वसामान्यांना काहीही मिळाले नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, या अर्थसंकल्पाची मांडणी केली गेली आहे. पुन्हा एकदा डिजीटल स्वप्न दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केला असून त्यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प सर्व वर्गाची घोर निराशा करणारा दिशाहीन व अर्थहीन संकल्प आहे – सिद्धाराम म्हेत्रे,माजी मंत्री
◆ एक स्थिर कररचना असलेला देश
यावर्षीच्या अर्थसंकल्पात कररचनेत फारसा बदल न करता भारत एक स्थिर कररचना असलेला देश आहे असे आंतरराष्ट्रीय पातळीवर दर्शविणे हा हेतू दिसून येतो. कोरोना मुळे त्रस्त असलेल्या नोकरदार व व्यापारी वर्गाला काही करसवलती दिल्या असत्या तर त्याचे स्वागत झाले असते, पण तसे झालेले दिसत नाही. आरबीआय डिजिटल रुपया वितरित करेल म्हणजेच भारताला स्वतःची वैधानिक डिजिटल करन्सी मिळेल आणि भारतीयांसाठी हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय असेल. रस्ते आणि रेल्वे विकासासाठी भरीव तरतूद केलेली आहे. स्टार्टअप्ससाठी करसवलती आणखी एक वर्ष चालू ठेवण्याचा निर्णय स्वागतार्ह्य आहे – सीए शुभम चव्हाण, अक्कलकोट
◆ आजचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या
हिताचा नाही, तो सरकारच्याच हिताचा !
अर्थमंत्री सीतारामन यांनी संसदेत मांडलेला अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा नसून सर्व मोठ्या धनदांडग्या व्यावसायिकाच्या हिताचा आहे त्यामध्ये कपड्यासाठी किंमत कमी केलेले आहे असे लक्षात येते.परंतु दैनंदिन जीवनामध्ये आमच्या महिला भगिनीला ज्या किचनमध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत.गेल्या पाच वर्षात महाग झालेले आहेत त्याचा विचार केला गेला नाही.
गेले दोन-तीन वर्षांपासून सरकारी कर्मचारी यांच्यासाठी कुठलाच बदल केला नाही.त्यांना कुठल्या सवलती दिलेल्या नाहीत त्यामुळे हा अर्थसंकल्प माझ्या दृष्टीकोनातून जनतेच्या हिताचा नसून सध्याचे केंद्र सरकार आहे त्यांच्या हिताचा आहे – दिलीप सिद्धे,तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
◆ दूरगामी परिणाम करणारा अर्थसंकल्प
अर्थमंत्र्यांनी दूरगामी परिणामकारक तरतुदी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, रेल्वे, शिक्षण आणि शेती क्षेत्रात भरीव निधीची तरतूद केली आहे, साहजिकच रोजगाराची उपलब्धी होण्यात मदत होणार आहे, परिणामी कोरोना मुळे आर्थिक संकटात अडकलेल्या जनतेच्या खिशात पैसा येईल आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. कृषी क्षेत्रात रसायन रहित शेतीला प्राधान्य दिल्याने मानवी आरोग्य संतुलित राहणार आहे. जे काही उद्योजक सेंद्रिय शेती पूरक व्यवसाय करतील त्यांना नाबार्ड अंतर्गत कर्ज पुरवठा केला जाणार आहे. एकंदरीत पाहता सदर अर्थसंकल्प हा तात्काळ परिणामी नसला तरी याचा परिणाम हा दूरगामी आहे – सीए ओंकारेश्वर उटगे, अक्कलकोट