ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशाच्या अर्थसंकल्पावर जिल्ह्यातील मान्यवरांच्या विविध प्रतिक्रिया

सोलापूर, दि.१ : देशाचा अर्थसंकल्प आज सादर झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत या पार्श्वभूमीवर मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रिया.

★ सर्वंकष, सर्वस्पर्शी पायाभूत विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प – खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा 2022 चा सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाच्या विकासात दूरगामी परिणाम करणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, साबका विकास या मंत्राप्रमाणे सर्वच घटकांना सोबत घेत पायाभूत सुविधांचा विकास साधणारा अर्थसंकल्प असल्याचे खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी भाष्य केले.

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी देशाचा 2022 चा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प देशाचा नागरिक विकासाचा केंद्रबिंदू मानून सादर केला. शिक्षण, आरोग्य, कृषी, महिला, दलीत वंचित बांधवांच्या विकासाला अधिक प्रोत्साहन देणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस व कार्गो टर्मिनलसाठी भरघोस प्रोत्साहन दिल्याने सोलापूरसाठी सकारात्मक बाब असल्याचे खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी यांनी सांगितले.

विशेषतः कोरोनामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आखली आहे. शिक्षकांना डिजिटल साधनांनी सुसज्ज केले जाईल जेणेकरून ते मुलांना प्रादेशिक भाषेत जागतिक दर्जाचे शिक्षण देऊ शकतील. प्रादेशिक भाषांमध्ये इयत्ता 1 ते 12 पर्यंत मोफत टीव्ही चॅनेलची संख्या 200 पर्यंत वाढवली जाईल.
सध्याची परिस्थिती पाहता डिजिटल शिक्षणाला चालना दिली जाईल. त्यासाठी डिजिटल विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. विद्यापीठात वैयक्तिक भाषेत (स्थानिक भाषा) आयसीटी (माहिती संप्रेषण तंत्रज्ञान) फॉरमॅटवर शिक्षण दिले जाईल. तसेच, कौशल्य विकास आणि उपजीविकेसाठी डिजिटल इकोसिस्टम सुरू केली जाईल. ऑनलाइन प्रशिक्षणाद्वारे नागरिकांना कौशल्य, पुनर्कुशलता आणि उच्च कौशल्य प्रदान करणे हा त्याचा उद्देश असेल. नोकऱ्या आणि संधी शोधण्यासाठी API आधारित कौशल्य क्रेडेन्शियल आणि पेमेंट स्तर देखील असतील.

अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा मोठा परिणाम झाल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगत देशात 60 लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच स्टार्टपसाठी नाबार्डच्या माध्यमातून तरुणांना आर्थिक मदत करणार असल्याचेही सीतारामन यांनी यावेळी म्हटलं आहे.

2022-23 साठीचा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन सांगितले की, डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. देशाचा विकास दर 9.27 टक्के असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच 30 लाख अतिरिक्त नोकऱ्या देण्याची क्षमता आहे.

देशातील मोठ्या शहरांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासाठी बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी आणली जाणार आहे. यामुळे देशात इलेक्ट्रीक वाहने वापरण्याचे प्रमाण वाढणार आहे. देशात सध्या इलेक्ट्रीक वाहनांसाठी मोठी मागणी आहे. परंतू चार्जिंग स्टेशनची कमतरता असल्याने याकडे लोक मोठ्या प्रमाणावर वळत नाहीएत. शहरांमध्ये जागा अपुरी असल्याने मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन उभारू शकत नाही. यामुळे शहरांसाठी बॅटरी स्वॅपिंग योजना आणली जाणार आहे.

★ उच्च शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल
करणारा अर्थसंकल्प : कुलगुरू

सोलापूर- कृषी, उद्योग, व्यापार, औद्योगिक आणि शिक्षण क्षेत्राला उपयुक्त असा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडणाऱ्या गोष्टींची तरतूद अर्थसंकल्पात प्रामुख्याने केलेला दिसून येतो. डिजिटलायझेशन, ऑनलाइन एज्युकेशन, इनोव्हेशन, स्टार्टअप सारख्या गोष्टीमधून रोजगार निर्मिती करण्यासाठी भरीव तरतूद अर्थसंकल्पात झालेला आहे. एकूणच यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात चांगले बदल होऊन त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रातील अनेक व्यवस्थांना भरघोस मदत करत वाढत्या शहरीकरणात संदर्भातही ठोस पावले अर्थसंकल्पाच्या माध्यमातून उचलण्यात आली आहेत. पायाभूत सोयी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद झालेली आहे, त्यामुळे सामान्य जनतेवरही त्याचे चांगले परिणाम होतील. डिजिटल व्यवहार आणि त्याचे जीडीपीवर होणारे परिणाम याबाबत ही अर्थसंकल्पात तरतूद झाले आहे. यामुळे हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक दिसून येतो – डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

★ सर्वच घटकांना सामावून घेणारा अर्थ संकल्प : आ. सुभाष देशमुख

सोलापूर : भारताला आत्मनिर्भर आणि  बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा या बजेट मधून देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. पुढील दूरदृष्टी ठेवून हा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला आहे. शिक्षण, रोजगार, शेती, उद्योग, महिला, तरुण, विद्यार्थी अश्या सर्वच घटकांना सामावून घेणारा हा अर्थसंकल्प आहे. पायाभूत सुविधांचा विचार केल्यास रस्ते महामार्गाच्या विकासाची गती आता 25 हजार किलोमीटर पर्यंत वाढवून तसेच येत्या काळात 400 वंदे भारत रेल्वे सुरू करून उज्जवल भविष्याची नांदी दिली आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!