ध्यास विश्वसार्ह बातमीचा

188 पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व बहाल ; अमित शहा यांचा घणाघात !

अहमदाबाद : वृत्तसंस्था

देशातील मोदी सरकारने गेल्या काही महिन्यापूर्वी देशात नागरिकत्व कायदा (सीएए) लागू झाल्यानंतर अनेकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. याअंतर्गत रविवारी येथे आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते 188 पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले.

सीएएवरून काँग्रेस आणि मित्रपक्षांनी मुस्लिमांना भडकावले. त्यांच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे स्वातंत्र्यानंतर शेजारील देशांतून आलेल्या हिंदू, बौद्ध आणि शिखांना न्याय मिळाला नाही, असा घणाघात शहा यांनी याप्रसंगी केला.

शहा म्हणाले, बांगला देशात फाळणी झाली, तेव्हा तिथे 27 टक्के हिंदू होते. आता तेथे केवळ नऊ टक्के हिंदू शिल्लक आहेत. बाकीचे हिंदू गेले कुठे? आम्ही 2019 मध्ये सीएए आणल्यामुळे कोट्यवधी हिंदू, जैन आणि शीख धर्माच्या लोकांना नागरिकत्व मिळाले. इंडिया आघाडी या विषयावरून मुस्लिमांना भडकावण्याचे काम करत आहे. हा कायदा कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेत नाही हे मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो. तथापि काही राज्य सरकारे यावरून लोकांची दिशाभूल करत आहेत.

अल्पसंख्याकांना मोदींनी न्याय दिला काँग्रेसने केवळ तुष्टीकरणाचे राजकारण केले. त्यामुळे शेजारील देशांमध्ये हालअपेष्टा सहन करत असलेल्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व मिळाले नाही. अशा कोट्यवधी लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्याय दिला. मी माझ्या सर्व निर्वासित बांधवांना सांगतो की, तुम्ही नागरिकत्वासाठी कोणताही संकोच न करता अर्ज करा. तुमचे काहीही चुकीचे होणार नाही. यामध्ये कोणत्याही फौजदारी खटल्याची तरतूद नाही, तुमचे घर, तुमची नोकरी, सर्व काही अबाधित राहील. विरोधक तुमची दिशाभूल करत आहेत, असेही शहा म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!