मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लालबागच्या राजाला गणेशोत्सवात अर्पण करण्यात आलेल्या वस्तूंच्या लिलावातून मंडळाने तब्बल २ कोटी ३५ लाख रुपयांची कमाई केली. यातील सर्वात महागडी वस्तू जवळपास ७६ लाखांना विकली गेली.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईभरातून आणि बाहेरगावाहून लाखो भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. या काळात भाविक कित्येक किलो सोने- चांदी, हिरे गणपतीला अर्पण करतात. गणेशोत्सव संपल्यावर या सर्व वस्तूंचा लिलाव केला जातो. यंदाचा लिलाव शनिवारी झाला. यातून लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला तब्बल २ कोटी ३५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
लिलावात १ किलो सोन्याची वीट होती. या विटेला सर्वात जास्त म्हणजेच ७५ लाख ९० हजार रुपये इतकी मोठी बोली लागली. त्याखालोखाल ९९० ग्रॅम सोन्याच्या हाराची विक्री ६९ लाख ३१ हजार रुपयांना झाली. केवळ ४०० ग्रॅमचा ३० हजार रुपये किमतीचा चांदीचा उंदीर घेण्यासाठी दोन ग्राहकांमध्ये चुरस लागली होती. त्यामुळे बोली वाढत जाऊन तब्बल २ लाख १५ हजार रुपयांना त्याचा लिलाव झाला. २२२ ग्रॅमच्या चांदीच्या मोदकाची किंमत १३ हजार रुपये सांगण्यात आली होती. या मोदकाला साडेतीन पट किंमत मिळाली. ४५ हजारांना त्याची विक्री झाली. ४०० ग्रॅम चांदीची देवींची त्रिमूर्ती १ लाख ३० हजारांना विकली गेली. १०० ग्रॅम सोन्याचे बिस्कीट ७ लाख ६५ हजारांना, तर ४ लाख ५७ हजार रुपये किमतीचा ६५ ग्रॅम ४०० मिलीग्रॅम वजनाचा सोन्याचा हार ४ लाख ७० हजारांना खरेदी करण्यात आला.गणेशोत्सवाच्या ११ दिवसांमध्ये ५ कोटी ६५ लाख इतकी रोख रक्कम लालबागच्या राजाचरणी भाविकांनी अर्पण केली आहे. ही रक्कम आणि लिलावातून मिळालेले उत्पन्न असे एकूण ८ कोटींहून अधिक उत्पन्न यावर्षी लालबागचा राजा मंडळाला प्राप्त झाले आहे.