उत्तर सोलापूर तालुक्यातील 23 गावांचे होणार ड्रोनद्वारे भूमापन, उपअधीक्षक भूमी अभिलेख प्रमोद जरग यांची माहिती
सोलापूर : गावांच्या जागेतील शेत जमिनी सोडून (महानगरपालिका/नगरपालिका/नगर पंचायत यापूर्वी गावठाण भूमापन झालेल्या गावांचे क्षेत्र वगळून) गावठाणातील जमिनींचे (मिळकतीचे) ड्रोनद्वारे भूमापन (मोजणी) करण्यात येणार आहे. सर्व्हे ऑफ इंडिया, ग्रामविकास विभाग आणि भूमी अभिलेख विभागा यांच्यातर्फे उत्तर सोलापूर तालुक्यातील 23 गावांच्या गावठाणांचे 30 जुलै 2021 पासून ड्रोनद्वारे भूमापन होणार असल्याची माहिती उपअधीक्षक भूमी अभिलेख प्रमोद जरग यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
ड्रोनद्वारे गावठाणांचे भूमापन हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून याचा ग्रामस्थांना फायदा होणार आहे. सर्वेक्षण करून प्रतिमांचे भूसंदर्भीकरण आणि भूमीकरण करण्यात येणार आहे. यानुसार ड्रोनद्वारे गावठाण मोजणीअंती प्राप्त नकाशाचे अभिलेख अद्ययावत करून उतारे तयार करण्यात येणार आहेत.
गावनिहाय सर्वेक्षण पुढीलप्रमाणे..
इंचगाव, गुळवंची, एकरूख (30 जुलै), होनसळ, पाथरी, पडसाळी (2 ऑगस्ट), दारफळ गावडी, तरटगाव, भागाईवाडी (3 ऑगस्ट), राळेरास, तेलगाव, बाणेगाव (4 ऑगस्ट), खेड, नंदूर, समशापूर(5ऑगस्ट), साखरेवाडी, भोगाव, हगलूर (6 ऑगस्ट), तळेहिप्परगा, वांगी, सेवालालनगर (9 ऑगस्ट) आणि बेलाटी, शिवणी (10 ऑगस्ट 2021)
सर्व हितसंबंधित ग्रामस्थांनी आपल्या मिळकतीचे स्थळ निश्चित करण्यासाठी पुराव्याच्या कागदपत्रासह प्रत्यक्ष मिळकतीच्या ठिकाणी उपस्थित रहावे. आपल्या अनुपस्थितीमध्ये स्थानिक चौकशी आणि प्रत्यक्ष जागेवरील उपलब्ध माहितीद्वारे कार्यवाही करण्यात येणार आहे, असेही श्री. जरग यांनी सांगितले आहे.