मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक असताना आगामी काळात विधानसभा निवडणूक येत असल्याने त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. 13 जुलै नंतर 288 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करायचे की, 288 मतदार संघातील उमेदवार पाडायचे? याचा निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. जालना जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
मराठा समाजाला सगेसोयरेंच्या माध्यमातून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले होते. मात्र, राज्य सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी 13 जुलैपर्यंत मुदत दिली आहे. या कालावधीतला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेणार? याकडे सर्व मराठा समाजाचे लक्ष लागले आहे. आपण 13 जुलैपर्यंत राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. मात्र तोपर्यंत सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी झाली नाही, तर 13 तारखेनंतर निर्णय घेऊ, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. पण मराठा समाजाला हक्काचे आरक्षण दिले नाही तर पुढील निर्णय मराठा समाजाला विचारून घेतला जाईल, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाला विचारूनच 288 उभे करायचे की 288 पाडायचे याचा निर्णय घेऊ, असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.