नांदेड : वृत्तसंस्था
महापालिके अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेतून माळटेकडी परिसरामध्ये नवीन मल उपसा केंद्र उभारणीचे काम सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी दोन मजुरांसह सुपरवायझरचा विषारी वायूमुळे चेंबरमध्ये गुदमरून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड-वाघाळा महापालिके अंतर्गत माळटेकडी परिसरात नवीन मल उपसा केंद्र होत आहे. हे काम ठेकेदारामार्फत होत असून गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास राजू मेटकर, शंकर वडजे (दोघे रा. खरबी, ता. भोकर) व विक्की पुयड (रा. कामठा) हे तिघेजण मलवाहिनीचे चेंबर बंद करण्यासाठी आत उतरले होते. अचानकपणे गॅसची गळती होऊन दोन मजुरांसह एका सुपरवायझरचा गुदमरून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच विमानतळ ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव यांच्यासह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे मृतदेह ड्रेनेजबाहेर काढून ते शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.