ध्यास विश्वसार्ह बातमीचा

३००० कोटींचे धन जनतेला परत करणार ; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पश्चिम बंगालमधील गरिबांचे लुटलेले व अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केलेले तब्बल ३००० कोटींचे धन आम्ही जनतेला परत करणार आहोत. हे काम पूर्ण करण्यासाठी आम्ही कायदेशीर पर्यायांचा शोध घेत आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. एनडीए सरकार भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून फेकण्यासाठी कटिबद्ध आहे. तर दुसरीकडे सर्व भ्रष्ट लोक परस्परांना वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत, अशा शब्दांत मोदी विरोधकांवर कडाडले.

पश्चिम बंगालच्या कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार महुआ मोइत्रा यांच्या विरोधात आपले नशीब आजमावणाऱ्या भाजपच्या उमेदवार अमृता रॉय यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ मिनिटे ३६ सेकंद दूरध्वनीवरून चर्चा केली. यावेळी मोदी म्हणाले की, बंगालमध्ये नोकरी मिळवण्यासाठी लाचखोरीच्या रूपाने देण्यात आलेला पैसा जवळपास ३००० कोटींच्या घरात आहे. याबाबत रॉय यांनी जनतेपुढे वाच्यता करावी. भाजपला पुन्हा सत्ता मिळाल्यास भ्रष्टाचाराची कमाई पुन्हा जनतेला परत मिळावी म्हणून आम्ही कायदेशीर पर्याय शोधणार आहोत, असे मोदींनी नमूद केले.

ज्या पक्षाने आम आदमी पक्षाविषयी (आप) भ्रष्टाचाराची तक्रार केली. आता तोच पक्ष आपला पाठिंबा देत असल्याचा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला. युवकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी भ्रष्टाचारमुक्त देश घडवायचा आहे, पण सर्व भ्रष्ट विरोधक परस्परांना वाचवण्यासाठी एकत्र आल्याची टीका मोदींनी केली. अमृता रॉय या अठराव्या शतकातील स्थानिक राजा कृष्णचंद्र रॉय यांच्या घराण्यातील आहेत. मोदींसोबतच्या संभाषणात रॉय म्हणाल्या की, मला व माझ्या घराण्याला देशद्रोही संबोधले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!