सोलापूर : प्रतिनिधी
३६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १३ जून २०२२ ते आजतागायत घडली. या प्रकरणी आदित्य पुरुषोत्तम पडसलगी (वय-२९, रा. पद्मानगर, न्यू पाच्छा पेठ) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून प्रकाश थाडाराम वासवानी (रा.वाघोली, पुणे) व धनाजी मनु वाघारी (रा. अशोक नगर, येरवडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा टेक्स्टाईल एजन्सी या नावाने टॉवेल, चादर, ब्लँकेट, बेडशीट इत्यादी कमिशनवर विक्री करण्याचा व्यवसाय असून, दि. १३ जून २०२२ ते ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत वेगवेगळ्या कारखानदारांकडून माल घेऊन तो वरील संशयित आरोपी प्रकाश यांच्या श्री शेठ सावरिया ट्रेडर्स पुणे नावाच्या फर्मला २४ लाख ३ हजार ९४६ रुपये व धनाजी यांच्या कल्पना सारी पुणे या फर्मला ११ लाख ९६ हजार रुपये किमतीचा एकूण ३६ लाख रुपयांचा टॉवेल, बेडशीट, ब्लँकेट हा माल तयार करून पुरविला. परंतु, वरील संशयित आरोपी यांनी फिर्यादीकडून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करत वेळोवेळी माल घेऊन त्याचे पैसे फिर्यादी यांनी वारंवार मागितले असता, वरील संशयित आरोपी यांनी पैसे देण्यास टाळाटाळ करून फिर्यादी यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.