ध्यास विश्वसार्ह बातमीचा

श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३७ वा. वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा उत्सव -२०२४

स्वामींचे भक्त संपूर्ण भारतभरातून अक्कलकोट येथे दर्शनासाठी येतात. काळानुरूप भक्त मंडळींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे. १९८८ पासून आज पर्यंत स्वामी समर्थांच्या अन्नछत्र मंडळात अनेक वैशिष्टयपूर्ण बदल घडले आहेत.   पण या सर्व भक्तमंडळींना “अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राण वल्लभे, ज्ञान वैराग्य सिध्यर्थं भिक्षान् देहीच पार्वती” या श्र्लोकाची प्रचिती अन्नपूर्णेच्या रूपात देत, स्वामींच्या कृपा प्रसादाचा लाभ मिळवून दिला आणि अन्नदानाच्या या महाचळवळीचा पाया रचला तो श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासच्यावतीने.  १९८८ पासून अतिशय पुण्याचं पण तेवढंच आव्हानात्मक व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे काम संस्थापक अध्यक्ष माननीय श्री जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासच्या या स्वामी कार्यावर  टाकलेला हा एक दृष्टिक्षेप…..
स्वामी सेवेचा ध्यास आणि अक्कलकोट येथे येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या उद्देशाने, गुरूपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सन १९८८ मध्ये सन्माननिय श्री. जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज यांनी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे प. पू. श्री. मोहन पुजारी आणि आपल्या इतर सहकार्‍यांच्या सहयोगाने,  अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत या धर्मादाय न्यास ची मुहूर्तमेढ रोवली.अन्नछत्राच्या उभारणी वेळी संस्थापकअध्यक्ष मा.श्री.जन्मेजयराजे  यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर प्रथमतः ३ किलो तांदळाचा प्रसाद स्वामींना महानैवेद्य म्हणून दाखवला, भाविकांना महाप्रसाद दिला आणि अन्नछत्र मंडळाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.  या धर्मादाय संस्थेचे रजिस्ट्रेशन (नोंदणी) झाल्यानंतर, सार्वजनिक धर्मादाय न्यास अस्तित्वात आले.
कै.अंबुबाई सरदेशमुख या मातोश्रींनी उदार अंत:करणाने वटवृक्ष मंदिराच्या उत्तर महाव्दारालगत स्वतःच्या जागेत अन्नछत्र सुरू करण्यास परवानगी दिली. सुरवातीला अगदी लहान स्वरूपात हे कार्य सुरू होते. पण  दिवसेंदिवस स्वामी भक्तांची वाढणारी गर्दी लक्षात घेता, या धर्मादाय न्यासाने देवस्थानच्या दक्षिण बाजूस कै.वीरभद्र कोळ्ळे यांच्या मालकीच्या जागेची रीतसर खरेदी  करून,  त्या जागेवर नियोजनपूर्वक मोठे पत्राशेड उभारून सन १९९४  मध्ये अन्नछत्राचा कार्य विस्तार केला. सध्याचे अन्नछत्र हे प्रशस्त आणि वातानुकूलित आहे. अनेक स्वामी भक्तांनी या पुण्यकार्यात सढळ हस्ते देणग्या दिल्या. देणग्यांचा ओघ ही वाढला आणि आजही तो सुरु आहे.सुरवातीच्या काळात एस.टी.महामंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सढळ हाताने मदत करून या कार्यास हातभार लावला. तसेच सोलापूरचे कै.बाळासाहेब शिंदे व कै.शिवाजीराव पिसे महाराज यांनी या कार्यासाठी खंबीर साथ दिली. त्याचप्रमाणे अॅड.मा. श्री.सुरेशचंद्र भोसले,पुणे आणि सन्मा.अॅड.श्री नितीनजी हबीब यांनी या स्वामी कार्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करीत मोलाची साथ दिली आहे. १९८८ पासून न्यासाचे विद्यमान सचिव श्री शामराव मोरे यांनी बहुमोल योगदान देऊ केले आहे.

 

 

स्वामी भक्तांचे व शहरवासी यांचे श्रध्देचे स्थान असलेल्या शमी विघ्नेश गणेशाची स्थापना १९९२ साली‘यात्रीभुवन’ समोर शमीच्या विशाल वृक्षाखाली करून सुंदर असे मंदिर त्या ठिकाणी उभारलेले आहे .या गणेशाची नित्योपचार व पूजा होत असून येथे श्री गणेश जयंती व श्री गणेश चतुर्थी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
सर्व स्वामी सेवेकऱ्यांच्या सहकार्याने, अन्नछत्र मंडळाचे कार्य आजतागायत अविरतपणे सुरू आहे. आजमितीसश्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दररोज दोन्ही वेळेस १५ ते २० हजारांवर स्वामीभक्त, महाप्रसादाचा लाभ घेऊन तृप्त होतात. उत्तम नियोजन, भक्तांच्या गर्दीचे सुयोग्य व्यवस्थापन, महाप्रसादासाठी गुणवत्तापूर्ण अन्नधान्याचा व भाजीपाल्याचा  वापर करण्याची दक्षता घेतली जाते तसेच सर्व गुणवत्ता मानकांची काळजीपूर्वक अंमलबजावणी ही केली जाते. तसेच वॉटर सॉफ्टनर च्या माध्यमातून भक्तांना क्षार विरहित व आर.ओ.(RO)चे पिण्याचे पाणी दिले जाते. दररोज केल्या जाणाऱ्या महाप्रसादात पोळी, मसालेभात, शिरा किंवा गव्हाची खीर, सांजा, आमटी, बटाटा- वांगी – काकडी भाजी, पालेभाज्या, पापड तर रात्री साधाभात,पोळी,भाजी,आमटी असे प्रसादाचे स्वरूप असते.  एकादशीच्या दिवशी साबुदाणा खिचडी, दही, भगर, आमटी, खजूर, केळी असे उपवासाचे पदार्थ असतात. दररोज सकाळी  ठीक ११.३० वा. मंदिरात अतिथी व मान्यवर देणगीदारांच्या हस्ते स्वामींना महानैवेद्य दाखवून, अन्नछत्रात महाआरती व संकल्प पार पडतात. यानंतर सर्व स्वामी भक्तांना महाप्रसाद दिला जातो. यासाठी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांची प्रमाणपत्र आयएसओ मूल्यांकन प्रमाणपत्र व भारत सरकारचे भोग प्रमाणपत्र ही मिळालेले आहे. येथे सुमारे ३०० सेवेकरी असून त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ त्यांना मिळणाऱ्या मानधनातून चालतो.

परगावच्या स्वामी भक्तांच्या निवासाच्या दृष्टीने यात्री निवास, यात्री भुवन ,अतिथी , गणेश मंदिर यात्री थांबा या निवासी इमारती बांधल्या असून यामध्ये स्वामी भक्तांना सोयी सुविधा देऊ केल्या आहेत .यात्री निवास ही भव्य इमारत २००३ पासून पासून स्वामी भक्तांच्या सेवेत रुजू झालेली आहे या इमारतीमध्ये मिनी हॉल सह कॉमन ६६ खोल्या असून १४ मोठे हॉल आहेत पैकी दहा हॉलमध्ये बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या इमारतीमध्ये सुमारे १५००भक्त निवासाला थांबू शकतील इतकी क्षमता आहे .  यात्री  भुवन या इमारतीत नॉन एसी सुट आणि एसी सुट तसेच डीलक्स एसी सुटस आहेत.  सदर इमारतीत सुमारे ५०० भक्त निवास करू शकतील इतकी क्षमता . आहे गणेश मंदिर यात्री थांबा या इमारतीत एकूण बारा एसी सुट असून सुमारे ५० भक्त निवास करू शकतील इतकी क्षमता आहे. अतिथी निवास ही इमारत सुद्धा एसी असून येथे सुद्धा ५० भक्त विश्रांतीस राहू शकतील इतकी क्षमता आहे त्याचप्रमाणे स्वतंत्र पलंग व्यवस्था सुरू असून याची क्षमता ६१ इतकी आहे या सर्व इमारतीत लिफ्ट यंत्रणा कार्यान्वित असून अग्निशमन यंत्रणा सुद्धा बसविलेली आहे.सद्यस्थितीत अन्नछत्र मंडळाच्या परिसरात प्रशस्त आणि भव्य असे ४ एकरातील वाहनतळ, वाहनतळ शेड तसेच २७० के.वी. क्षमतेचा सोलर प्रकल्प कार्यान्वित आहे. अन्नछत्रामध्ये मा.जन्मेजयराजे भोसले महाराज, संस्था.अध्यक्ष यांनी स्वतः पुढाकार घेऊन सागवानी व उत्तम कलाकुसर केलेला असां स्वामींचा रथ केला असून हा रथ प्रतिवर्षी श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी वेळेस ७ दिवस पहाटे वेळेस शहरातून नगर प्रदक्षिणेस निघत असतो.
भोसले घराण्याशी असलेले जुना ऋणानुबंध जपत भारतरत्न, गानसम्राज्ञी,आदरणीय स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांनी त्यांच्या वापरात असलेली दोन वाहने भेट म्हणून देऊ केलेली आहेत. न्यासाने  मंडळाच्या परिसरामध्ये ती वाहने जतन करून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्राची संस्कृती आणि इतिहास दर्शन घडवणारे  शिव चरित्र, धातुशिल्प प्रदर्शन भक्तांना पाहण्यासाठी उभारण्यात आले आहे. भारतरत्न गानसमाज्ञी आदरणीय लतादिदी मंगेशकर यांचेही मार्गदर्शन वेळोवेळी या न्यासास लाभलेले आहे. “गडकिल्ले सृष्टी” ही त्यांच्याच संकल्पनेतून साकारण्यात आली आहे. अतिथी निवासाजवळ स्वामींची महती भक्तांना कळण्यासाठी श्री स्वामी समर्थ जीवन चरित्र भित्ती शिल्प साकारण्यात आले आहे.

अतिशय निसर्गरम्य वातावरणात सुशोभित आणि हिरवळीने नटलेल्या या आवारात श्री स्वामी समर्थ वाटिका व बालो‌द्यान सर्वांचेच लक्ष वेधून घेतात.न्यासाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रतिवर्षी भव्य प्रमाणात आयोजित करण्यात येणारे “गुरुपौर्णिमा” आणि “वर्धापन दिन” हा महोत्सव. या १० दिवसिय धर्मसंकिर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्रामधील दिग्गज प्रवचन- कीर्तनकार, गायक कला‌कार आपली  सेवा स्वामींच्या चरणी रुजू करतात. त्याचप्रमाणे १९८८ पासून  स्वामी दर्शनास, उत्सवास व कार्यक्रमाच्या निमित्त्य अन्नछत्रास वेळोवेळी सदिच्छा भेट देऊन व मार्गदर्शन करणाऱ्या दिग्गज मंडळी, मान्यवर व सन्मा.देणगीदार यांनी न्यासाचे कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार  करण्याच्या उद्देशाने,  प्रतिवर्षी “श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा काढण्यात येते.” पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, गोवा, कर्नाटक या राज्यातील स्वामी भक्तांना या माध्यमातून स्वामींच्या दर्शनाचा लाभ अन्नछत्र मंडळाच्या वतीने देण्यात येतो. सन १९९८ पासून  ही पालखी परिक्रमा अखंडितपणे सुरू आहे.अन्नदानाच्या या पवित्र कार्याबरोबरच, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्यावतीने अनेक सामाजिक कार्यांना हातभार लावला गेला आहे आणि या माध्यमातून लोकाभिमुख अशा कामांना, कायमच प्राधान्य दिले जाते.   त्या समाजोपयोगी कार्याचा  हा आढावा…
१९९३ च्या किल्लारीच्या महाविनाशकारी भुकंपाच्या वेळेस या न्यासाने सलग एक महिना दररोज ट्रक भरून अन्नवाटप केलेले आहे.      सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत या न्यासाने अक्कलकोट शहर विकास कार्यासाठी मोठे योगदान दिले आहे.  स्वमालकीच्या जमिनीपैकी ४१/२एकर जागा मुस्लीम कब्रस्तानास, ३एकर जागा लिंगायत स्मशानभूमीसाठी आणि ११/२एकर जागा बाह्यवळण रस्त्यास तसेच भक्तांच्या सोयीसाठी सुलभ शौचालयाकरीता मुस्लिम कब्रस्तानाजवळ स्वमालकीची जागा नगरपरिषदेस दिली आहे .  ८ कि.मी. अंतरावर असलेल्या गळोरगी येथील स्वमालकीच्या विहीरीतून ५ कोटी खर्चून अन्नछत्रासाठी कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजना केली आहे, तसेच वटवृक्ष देवस्थानाससुध्दा पाणी देऊ केले आहे. २०१४ मध्ये उद्भवलेल्या तीव्र पाणीटंचाई आणि दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये अन्नछत्र मंडळाच्या वतीने,  गळोरगी येथील स्व-मालकीच्या विहिरीतून पाईप लाईनव्दारे पाणी आणून सलग बारा महिने दररोज १२ लाख ५० हजार लिटर पाणी अक्कलकोट नगर परिषदेस देण्यात आले.
हे न्यास भूकंपग्रस, जळीतग्रस्त , पूरग्रस्तांना तातडीने मदतीचा हात पुढे करते तसेच गरिब व गरजवंताना शैक्षणिक व वैद्यकीय मदत करते.  ऑगस्ट २०१९ ला कोल्हापुर व सांगली तसेच डिसेंबर २०२१ ला चिपळूण येथील पुरग्रस्तांना तातडीने जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य शिधा वाटप करून, आपलं योगदान दिले आहे.सर्व सण ,उत्सव व इलेक्शन ड्युटीस कार्यरत असणारे सर्व शासकीय कर्मचारी व पोलीस बांधवांच्या भोजनाची व्यवस्था सुद्धा न्यासाकडून केली जाते. पोलिओ लसीकरणाचे वेळेस शहरातील कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना भोजन व्यवस्था केली जाते. शासनाचे विविध उपक्रमास हे न्यास सर्वोतोपरी सहकार्य करते.राज्य परिवहन मंडळाच्या बाहेर गावाहून मुक्कामी येणाऱ्या सुमारे ४० ते ४८ बसेसच्या चालक व वाहकांना सुद्धा अद्ययावत असे विश्रांती कक्ष व वाहनतळ न्यासाकडून या परिसरामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे.
आतापर्यंत प्रति महिन्याची पौर्णिमा व मंडळास साजरा केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उत्सवा प्रसंगी २०१४ पासून सुमारे २०,००० पेक्षाही जास्त राक्त्दात्यांकडून रक्त संकलन केले आणि खऱ्या अर्थाने रक्तदानाची चळवळ अक्कलकोट तालुक्यात रुजविली.  तसेच स्वामी भक्तांसाठी  अद्ययावत वैद्यकीय सुविधांनी युक्त अँब्युलन्स सेवा आणि फायर ब्रिगेड ची व्यवस्था उपलब्ध आहे.दिव्यांग व वृद्ध लोकांना अन्नछत्रपरीसरात ने आण करण्यासाठी इलेक्ट्रिक बग्गी व व्हीलचेअरची सोय केली आहे.
हे धर्मादाय न्यास शासनाच्या विविध योजना व  कार्यक्रमास नेहमी भरीव सहकार्य करीत असते.  सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक, पर्यावरण विषयक, क्रिडाविषयक व सांस्कृतिक उपक्रम सदैव राबवित असते.  स्त्रिभृण हत्या, हुंडाबळी, महिला आरोग्य, वृक्षे लावा व जगवा, जल साक्षरता अभियान, स्वच्छता अभियान इ. कार्याच्या माध्यमातून हे न्यास सदैव अग्रेसर आहे.
वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन या महत् कार्यात सोलापूर-अक्कलकोट रस्त्याच्या दुतर्फा, वडाची झाडे लावून त्याचे जतन आणि संवर्धन करण्यात आले. शहरातील चौकाचे सुशोभीकरण केले आहे. फत्तेसिंह मैदानावर बसण्यासाठी सुमारे ४० नग सिमेंट बाकडे बसविले असून वृक्षारोपण व संवर्धन करून नगरपालिकेच्या विकास कार्यात मोठे योगदान देऊ केले आहे. अक्कलकोट शहराच्या विकासामध्ये श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने मोलाची भूमिका बजावलेली आहे. न्यासाच्या १९८८ पासून अविरत सेवेमुळे अक्कलकोट शहरातील व लगतच्या भागातील लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध झालेला आहे.
अन्नछत्राच्या चौकात पोलीस चौकी, तहसील कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालय, या ठिकाणी कायमस्वरूपी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोना काळात सामाजिक जाणिवेतून पुणे येथील कलावंताना मे २०२१ मध्ये मदत म्हणून सुमारे ३०० अन्नधान्य किटचे वाटप केले आहे. याच दरम्यान, अक्कलकोट येथील ग्रामीण भागात तसेच सोलापूर येथील गरजवंताना १२०० अन्नधान्य किट वाटप करण्यात आले. कोविडच्या आणि लॉकडाऊन च्या काळात, अक्कलकोट शहरामध्ये दररोज सुमारे १००० गरीब लोकांना तीन महिने जेवण वाटप केले. एकूण ५२ दिवसात ५१,५०० लोकांना अन्नवाटप केले आहे.  शहरात व ग्रामीण भागात सॅनिटायझर ची फवारणी वेळोवेळी केली.
यात्रीनिवास या निवासी इमारतीमध्ये शासनाचे कोविड सेंटर सुरू केले. तेथील पॉझिटिव्ह रुग्णांना दररोज चहा, नाष्टा, दोन वेळचे जेवण देण्याचे कार्य केले आहे. कोव्हिड सेंटरला स्थानिक प्रशासनाच्या मागणीनुसार ५० बेड, ५० गाद्या, ५० उशा व बेडशिटस देत व्यवस्था करण्यात आली तसेच ससून हॉस्पिटल पुणे येथे व्हेंटीलेटर देऊ केले आहे.
यत्र नार्यस्तू पुज्यंते रमंते तत्र देवता, या उक्तीला सार्थ करत, स्त्री शक्ती प्रति आदर व्यक्त करण्यासाठी “हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या” माध्यमातून हे न्यास उल्लेखनीय कार्य करीत आहे.
न्यासाचे संस्थाप‌क अध्यक्ष श्री. जन्मेजयराजे भोसले यांच्या बहुमोल मार्गदर्शनाखाली,  दत्तजयंती २०२१ पासून ‘समर्थ महाप्रसाद सेवा’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, अक्कलकोट शहरातील दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या जवळपास २६० गरीब, गरजवंत व निराधार लोकांना दैनंदिन दोन वेळेचे जेवण, डब्यातून घरपोच करण्याचे कार्य,  स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळामार्फत करण्यात येत आहे.
२०२१ मध्ये अन्नछत्रात अध्यक्षांचे कार्यालयालगत वटवृक्षाखाली असलेल्या जुन्या दत्त मंदिराची काळ्या पाषाणात उभारणी केली असून आतील सुंदर व देखणी दत्तमूर्ती जयपूरहून आणून स्थापित केली आहे.
अन्नछत्राच्या पूर्वेस समर्थ वाटिकेजवळ, कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या काळ्या पाषाणाच्या मंदिराचे बांधकाम प्रगतीपथावर असुन  अल्पावधीतच हे काम पुर्णत्वास जाणार आहे आणि भक्तांना दर्शनासाठी खुले होणार आहे.
ऑक्टोंबर २०२३ पासून सोलापूरच्या बी.सी. गर्ल्स हॉस्टेल मधील अनाथ १५० मुलींच्या भोजनासाठी दरमहा अन्नधान्य व खाद्यतेल पुरवठा केला जातो.  जानेवारी २०२४ पासून तालुक्यातील ५५ कुस्तीगीरांना दरमहा तूप, खारीक, बदाम, अक्रोड  इत्यादींचे खुराक वाटप सुरू केले आहे.
न्यासाने जगभरातील स्वामी भक्तांच्या सोयीसाठी मंडळात चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती www.swamiannachatra.orgया संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे.न्यासास देणगी देणाऱ्या देणगीदारास आयकरात ८० ची कलमान्वये सवलत आ`हे.
स्वामी भक्तांचे सोयीसाठी आणि ऑनलाइन देणगी देणे सहज सुलभ व्हावे यासाठी न्यासाने क्यू आर कोड प्रणाली सुद्धा विकसित केलेली आहे.
श्री स्वामी समर्थांची आध्यात्मिक महती,  त्यांचं कार्य, हे इतकं ओजस्वी आहे की, त्यांचे अनुयायी, भक्तगण यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे आणि भविष्यातही ही संख्या वाढतच राहणार.  ही महत्वपूर्ण बाब लक्षात घेऊन, सध्याच्या जुन्या महाप्रसाद गृहालगतच्या वाहनतळशेड, याठिकाणी भव्य नियोजित महाप्रसाद गृह साकारण्यात येणार असून नवीन तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेला, अभ्यासपूर्ण आराखडा अन्नछत्र मंडळाच्या वतीने  सादर करण्यात आला  आहे.
एक दृष्टिक्षेप- नव्याने बांधण्यात येणाऱ्या नियोजित महप्रसादगृहाच्या वास्तूवर….
          नियोजित ५ मजली महाप्रसादगृहाची इमारत ही भव्य आणि मंदिर सदृश्य असणार आहे. ही इमारत पूर्णपणे वातानुकुलित् असून या इमारतीचे बांधकाम क्षेत्र १ लाख १९,३९८ चौरस फुट असणार आहे. इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फुटांची सुंदर, रेखीव आणि भव्य मुर्ती, सर्वांचे लक्ष वेधून घेईल.
या नवीन नियोजित महप्रसादगृहात २५०० भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था असून, या आराखड्याच्या माध्यमातून हे पाहू शकता की,  एकूण ५ हजार भाविकांसाठी सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा प्रतिक्षा कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय या इमारतीच्या तळघरामधे धान्य- भाजीपाला कोठार, चटणी व पिठाची गिरणी तसेच १ तासामध्ये ८०० चपाती तयार करता येणाऱ्या ७ मशिन्स, आणि भांडे धुण्यासाठी डिश वॉशर यांची देखील सोय आहे. संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
सदर इमारतीचे बांधकाम करण्याची पुर्वतयारी झाली असुन  ही सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज व प्रशस्त इमारत, स्वामी भक्तांच्या  देणगीतून साकार होणार आहे.
या बांधकामाचा सर्वसाधारण अंदाजे खर्च रुपये ६० कोटी, इतका अपेक्षित आहे. सदर इमारतीस नगरपालिकेची रीतसर बांधकाम परवानगी घेतली आहे आणि अल्पावधीतच या इमारतीचे बांधकाम सुरू करण्याचा मानस आहे.
                                               || श्री स्वामी समर्थ ||
सदर नियोजित भव्य अशा५ मजली महाप्रसादगृह इमारतीचे भूमिपूजन दि.२१-७-२०२४, वार रविवार रोजी सकाळी ११ वा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे हस्ते संपन्न होणार आहे.
           शामराव मोरे 
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, श्रीक्षेत्र अक्कलकोट – सचिव
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!