सोलापूर : प्रतिनिधी
अक्षय तृतीयाच्या अनुषंगाने दोन दिवसात सुमारे ५० टन आंबे विकले गेले. गावरान आंब्यापासून हापूस, केसर पर्यंत आंब्याची खरेदी करण्यात आली. बाजारपेठेमध्ये आंबा खरेदी करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या असल्याचे देखील दिसून आले
साडेतीन मुहुर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. आंबा खरेदीला महत्व दिले जाते. त्यामुळं काल सकाळपासूनच कृषी उत्पन्न बाजार समिती, लक्ष्मी मार्केट, कस्तुरबा मार्केट विजापूर रोड, रेल्वे स्टेशन, सात रस्ता, नवी पेठ आदी परिसरामध्ये आंबा खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. देवगड हापूस बाराशे ते पंधराशे रुपये डझन होता. रत्नागिरी हापूस सहाशे रुपयांपासून बाराशे रुपयेपर्यंत डझन विकला जात होता. केशर आंबा २४० रुपये किलोप्रमाणे विक्री होत होती. गावरान आंब्यालाही शंभर ते दीडशे रुपयेपर्यंत डझनाला भाव मिळाला.
सोलापूरमध्ये देवगड, रत्नागिरी येथून हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली पायरी, लंगडा, गावरान आणि केशर या आंब्याची कर्नाटक आणि दक्षिण भारतातूनही आवक होत आहे. कोकणातील हापूस कमी येत असल्यानं दरही वाढले आहेत. सध्या ६०० ते १५०० रुपये डझन हापूस आंबा विकला जात आहे.