ध्यास विश्वसार्ह बातमीचा

६५ कोटींच्या पाच मजली महाप्रसादगृहामुळे अक्कलकोटच्या सौंदर्यात भर

अन्नछत्र मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

अक्कलकोट :  तालुका प्रतिनिधी

दि.२ : अलीकडच्या काळात अक्कलकोटच्या वैभवात भर टाकणाऱ्या अनेक गोष्टी सातत्याने घडत आहेत यात भर म्हणून की काय आता श्री स्वामी समर्थ
अन्नछत्र मंडळांने गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर ६५ कोटी रुपये खर्चाच्या भव्य महाप्रसाद गृहाच्या वास्तूची पायाभरणी करण्याचा निर्णय घेतला आहे.या वास्तूमुळे स्वामी भक्तांची तर सोय होईलच पण शहराच्या सौंदर्यातही मोठी भर पडणार आहे.

मागच्या दहा वर्षात स्वामींची प्रचिती व प्रसार हा भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे राज्यभरातील भाविकांचा लोंढा हा अक्कलकोटकडे वळत आहे. इतर तीर्थक्षेत्राच्या मानाने शहराचे भौगोलिक क्षेत्र कमी असले तरी याची उणीव भासू न देता स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून सातत्याने भाविकांना हायटेक सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.यात अनेक लोकोपयोगी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न अन्नछत्र मंडळामार्फत सुरू आहे,अशी माहिती अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे
भोसले यांनी दिली. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनीही यापूर्वी भाविकांना केंद्रबिंदू म्हणून मंडळाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमोलराजे यांनी देखील सुंदर वास्तू भाविकांच्या सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. नियोजित महाप्रसाद गृहाची इमारत भव्य तर असणारच आहे आणि ती विशेष म्हणजे मंदिर सदृश्य असणार आहे. ही इमारत पूर्णपणे वातानुकुलित असून या इमारतीचे बांधकाम क्षेत्र १ लाख १९ हजार ३९८ चौरस फुट असणार आहे.या नवीन नियोजित महप्रसादगृहात अडीच हजार भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था असून यात एकूण ५ हजार भाविकांसाठी बसून सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा प्रतिक्षा कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय या इमारतीच्या तळघरामधे धान्य- भाजीपाला कोठार, चटणी व पिठाची गिरणी तसेच १ तासामध्ये ८०० चपाती तयार करता येणाऱ्या ७ मशिन्स आणि भांडे धुण्यासाठी डिश वॉशर यांची देखील सोय असणार आहे. संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसविण्यात येणार आहे.या इमारतीची बांधकाम करण्याची पुर्वतयारी पूर्ण झाली असून ही सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज व प्रशस्त इमारत, स्वामी भक्तांच्या देणगीतून साकार होणार आहे. या बांधकामाचा खर्च रुपये ६५ कोटी इतका अपेक्षित आहे.या इमारतीस नगरपालिकेची बांधकाम परवानगी मिळाली असून अल्पावधीतच या इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे.भूमिपूजनाचा कार्यक्रम २१ जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

स्वामी समर्थांची ५१ फुटांची मूर्ती होणार

इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फुटांची सुंदर, रेखीव आणि भव्य मुर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेईल. इमारतीची उंची साधारण १२१ फूट राहणार आहे.हा
प्रकल्प पूर्ण होण्यास अडीच वर्षाचा कालावधी लागेल. ही वास्तू अतिशय देखणी आणि गुणवत्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न आमचा राहील.

  • योगेश अहंकारी,वास्तुविशारद

भाविकांना दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न

अन्नछत्र मंडळात सध्या उभी स्वामींची मुर्ती, महाप्रसादगृह, कपिला गाय, कारंजा, शिवस्मारक, वाटिका व बालोउद्यान,शिवचरित्र धातू शिल्प प्रदर्शन हे पाहण्यासाठी तर
मोठी गर्दी होतेच.पण आता राज्यभरातील भाविक हा जास्तीत जास्त काळ कसा अक्कलकोटमध्ये रमेल याकडे आमचे लक्ष आहे. त्यादृष्टीने आम्ही सोयी निर्माण करत आहोत.निश्चितच या पुढच्या काळात देखील भाविकांच्या सोयीसाठी आम्ही झटत  राहणार आहोत.

 – अमोलराजे भोसले,प्रमुख कार्यकारी विश्वस्त अन्नछत्र मंडळ

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!