ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट नगराध्यक्ष पदासाठी ७ तर नगरसेवक पदासाठी १०२ अर्ज मंजूर

छाननीत प्रमुख उमेदवारांचे अर्ज मंजूर

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेनंतर अंतिम उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या ११ अर्जांपैकी ४ अर्ज अवैध ठरले असून ७ अर्जांना वैधता देण्यात आली आहे. नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या १७५ अर्जांपैकी १०२ अर्ज वैध आणि तब्बल ७३ अर्ज अवैध ठरले आहेत.शुक्रवारी छाननीमुळे निवडणूक कार्यालय परिसरात मोठी हालचाल दिसून आली.

नगराध्यक्ष पदासाठी वैध ठरलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये अशपाक बळोरगी (काँग्रेस), इकरार शेख (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस), अशपाक बळोरगी (अपक्ष), बाबासाहेब जाधव (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना), मिलन कल्याणशेट्टी (भाजप), रईस टिनवाला (शिवसेना) आणि नागनाथ उमदी (अपक्ष) यांचा समावेश आहे.उमेदवारांची नावे निश्चित झाल्याने शहरात चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे.

छाननी दरम्यान काही अर्ज तांत्रिक कारणांमुळे बाद करण्यात आले. प्रभाग क्रमांक १० ‘अ’ मध्ये उबाठा गटाकडून सोनाली मोरे यांनी दाखल केलेला अर्ज जोडपत्र दोन ऐवजी जोडपत्र दोन दहा ‘ब’ जोडल्याने अवैध ठरवण्यात आला. अशाच प्रकारचे तांत्रिक दोष अनेक अर्जांमध्ये आढळले, ज्यामुळे उमेदवारांची संधी हुकली.

अवैध ठरलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या बहुसंख्य अर्जांमध्ये जोडपत्र दोनमध्ये पर्यायी उमेदवाराची नोंद नसणे किंवा पाच सूचकांचा अभाव ही मुख्य कारणे स्पष्ट करण्यात आली आहेत. या त्रुटींमुळे मोठ्या प्रमाणात अर्ज बाद झाल्याने निवडणूक आयोगाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी अधोरेखित झाली आहे.

अक्कलकोटमधील ही निवडणूक तिरंगी होण्याचे संकेत आता स्पष्ट दिसत आहेत. शिंदे गटाची शिवसेना, भाजप आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये मुख्य लढत रंगण्याची शक्यता असून वैध उमेदवार निश्चित झाल्याने प्रचाराला वेग येणार आहे. अंतिम माघारीनंतरचे चित्र आणखी स्पष्ट होणार असून यामुळे अक्कलकोटची राजकीय वातावरण मात्र तापू लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!