नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गोव्यातील शिरगाव याठिकाणी आयोजित श्री लैराई जत्रेदरम्यान शुक्रवारी रात्री एक दुःखद घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. याठिकाणी चेंगराचेंगरी झाली असून यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या दुर्घटनेत ३० हून अधिक लोक जखमी झाले. जखमींना तात्काळ गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) आणि म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शिरगावच्या पारंपारिक ‘जत्रे’मध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले असताना हा अपघात झाला. यावेळी प्रचंड गर्दीत गोंधळ उडाला, ज्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण होऊन ही दुर्घटना घडली. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे तर इतरांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. घटनेची माहिती मिळताच, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालय आणि बिचोलिम रुग्णालयाला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी जखमींची भेट घेतली आणि त्यांच्या उपचारांची विचारपूस केली आणि अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले.