सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूरहून कुसूरकडे निघालेली एसटी बस शुक्रवारी दुपारच्या दरम्यान मंद्रुप-निंबर्गी रस्त्यावरील काळे वस्तीजवळ स्टेअरिंगचा रॉड तुटून रस्त्याच्या खाली गेली आणि हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात ७५ प्रवाशांपैकी कोणीही गंभीर जखमी झालेले नाही.
मंद्रुपहून निंबर्गीमार्गे कुसूरकडे निघालेल्या राज्य परिवहन उपक्रमाच्या एसटी बसच्या काळे वस्तीजवळ येताच स्टेअरिंगचा रॉड तुटला. आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या मोठ्या झाडाला घासून ही बस पुढे खड्यात गेल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. एसटी बस (क्र. एमएच १४ बीटी ४०६२) सकाळी साडेअकरा वाजता सोलापूरच्या मुख्य बसस्थानकावरून प्रवाशांना घेऊन निघाली. मंद्रुप येथे आज आठवडा बाजार असल्याने परिसरातील लोक बाजारासाठी येत असतात. आज बाजारचा दिवस असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी होती. या बसमध्ये निंबर्गी, विंचूर, सादेपूर आणि बाळगी आदी गावातील जवळपास ७० ते ७५ प्रवाशांना घेऊन एसटी निंबर्गीच्या रस्त्याने पुढे निघाली होती. याच दरम्यान काळे वस्तीजवळ आल्यानंतर अचानक चालकाच्या हातातील स्टेअरिंगचा रॉड तुटला. आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोठ्या वडाच्या झाडाला घासून एसटी रस्त्याच्या खाली खड्ड्यात जाऊन चिखलात अडकली.
या घटनेने एसटीतील प्रवासी घाबरले आणि एकमेकांच्या अंगावर पडल्याने आरडाओरड सुरू झाली. काही मुलांनी खिडकीतून उड्या मारल्या. तर काही महिला प्रवासी चालकाच्या बाजूच्या दरवाज्यातून बाहेर आल्या. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुल्ले आणि त्यांचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धावले. सर्व जखमींना मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. स्नेहा माशाळे, भौराम्मा सोड्डे (रा. कुसूर), अमगोंडा हत्ताळे (रा. निंबर्गी), महादेव गवसाने व एसटी वाहक कविता चव्हाण (रा. सोलापूर) हे या अपघातात जखमी झाले. उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.