---Advertisement---

महाराष्ट्रात उष्णतेचा प्रचंड तडाखा; विदर्भ-मराठवाड्यात पावसाची शक्यता !

By team
On: March 12, 2026 4:02 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात सध्या उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. बहुतांश भागात हवामान कोरडे आणि उष्ण राहिले असून किनारपट्टीच्या भागात दमट वातावरणामुळे उकाडा अधिक जाणवत आहे. काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

मुंबई, ठाणे, पालघर यांसह संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या पावसाची कोणतीही शक्यता नसली तरी उकाडा आणि उष्णतेची लाट काही भागांमध्ये जाणवू शकते. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढलेला आहे. सध्या अकोला जिल्ह्यात सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर पुण्यात आज सुमारे 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.

पुणे वेधशाळेचे हवामानतज्ज्ञ सखाराम सानप यांनी नागरिकांना दुपारच्या कडाक्याच्या उन्हात बाहेर जाणे टाळण्याचे, पाणी आणि द्रवपदार्थ अधिक प्रमाणात घेण्याचे आवाहन केले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 13 आणि 14 मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या बदलामुळे राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेचा तडाखा कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईसह समुद्रकिनारी भागातही तापमानात वाढ झाली असून, काही ठिकाणी पहाटेच्या वेळी प्रदूषणामुळे धुक्यासारखा थर दिसून येत आहे. हवामान विभागाने याबाबत नागरिकांना घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!