हरियाणा : हरियाणात खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये राज्यातील भूमिपुत्रांसाठी ७५% आरक्षण लागू करण्यात आले आहे. हरियाणातील भाजप-जेजेपी आघाडी सरकारने पावसाळी अधिवेशनातच हे विधेयक विधानसभेत मंजूर केले होते. राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी मंगळवारी त्याला मंजुरी दिली. त्यानंतर आता या विधेयकाचे रूपांतर कायद्यात झाले आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या म्हणण्यानुसार, राज्याच्या खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांत हरियाणातील युवकांना पूर्ण वाटा मिळत नव्हता. एवढेच नाही तर गेल्या विधानसभा निवडणुकांत जेजेपीने निवडणूक जाहीर नाम्यात ७५% आरक्षणाचे आश्वासन दिले होते. भाजपने आपल्या संकल्प पत्रात ९०% पर्यंत स्थानिक युवकांना रोजगारासाठी प्रोत्साहन देण्याची घोषणा केली होती. दोन्ही पक्षांनी निवडणुकांत दिलेले आश्वासन आता पूर्ण होत आहे.