ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट कोव्हीड सेंटरला भरीव मदतीचा शिक्षकांचा निर्धार, शिक्षक संघटना समन्वय समितीचा संकलनासाठी पुढाकार

अक्कलकोट : कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेवर प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण येत आहे.दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात अपुऱ्या पडणाऱ्या शासकीय यंत्रणेस अधिक सक्षम करण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने पुढाकार घेत कोव्हीड सेंटरला आवश्यक वैद्यकीय साहित्य पुरविण्याचा निर्धार केला आहे. लवकरच निधी संकलन पूर्ण होऊन साहित्य वाटपाचे नियोजन करण्यात येईल.याप्रसंगी तहसीलदार अंजली मरोड यांच्याशी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन हा निर्णय घेतला.

कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक कोरोना योद्ध्यांची भूमिका पार पाडत असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग,कोरोना सर्वेक्षण,हाय रिक्स,लो रिस्क यादी बनविणे,लसीकरण, जनजागृती, चेकपोस्ट,ग्राम समितीच्या माध्यमातून जबाबदारी पार पाडणे या व इतर भूमिका पार पाडत आहेत.यावेळी अनेक शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय कोरोनाबधित झालेले असून काहींचा मृत्यूही झालेला आहे.कोरोनायोद्ध्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनानेही काळजी घ्यावी व शिक्षकांच्या अडचणींची तातडीने सोडवणूक करण्याची मागणी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने केली.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करत कोरोनाचे आदेश सक्षम अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने बजावण्यात यावेत.आदेश देताना रोटेशन पद्धत वापरावी आणि आदेशात नियुक्ती किती दिवसांसाठी करण्यात आली याचा उल्लेख करण्यात यावा.शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे व त्यासाठी स्वतंत्र केंद्राची सोय करावी,एका शिक्षकास एकच काम देण्यात यावे,दिव्यांग,गंभीर आजारानेग्रस्त,गरोदर माता,स्तनदा माता आणि ५० वर्षे वरील कर्मचाऱ्यांना याकामी सूट देण्यात यावी,कोरोनाबधित कर्मचाऱ्यांसाठी राखीव बेडची व्यवस्था करण्यात यावी.मयत कर्मचाऱ्यांचे विमा कवच आणि इतर शासकीय लाभ तातडीने मंजूर करण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी समन्वय समितीचे सिद्धाराम बिराजदार, विजय तडकलकर,योगेश बारसकर,तोरप्पा चव्हाण,परमेश्वर किणगे,बसवराज गुरव,राजश्री उप्पीन,अंबण्णा तेलुणगी,सिद्धाराम पुजारी,अविनाश मोरे,बालाजी हादवे,राजेंद्र मोहोळकर,ज्ञानेश्वर केंद्रे,दयानंद चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!