समर्थनगर पाणीपुरवठा योजनेचे काम ९० टक्के पूर्ण
जून अखेर पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, योजनेवर १२ कोटी ९७ लाख खर्च
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील समर्थनगर ग्रामपंचायतीसाठी नव्याने होत असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम आता ९० टक्के पूर्ण झाले आहे.जून अखेर येथील जनतेला मुबलक पाणी मिळण्याचा अंदाज आहे.या योजनेवर १२ कोटी ९७ लाख रुपये खर्च होत असून साधारण पंधरा हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा होणार असल्याने समर्थनगरची पाण्यासाठी सुरु असलेली वणवण मात्र या निमित्ताने थांबणार आहे.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत या योजनेला मोठा निधी मंजूर झाला होता. त्या निधीतूनच पाण्याच्या तीन टाकयाचे काम पूर्ण होत आहे जलशुद्धीकरण केंद्र, विहीर आणि पंप पाऊस ही कामे देखील पूर्ण झाली आहेत.आता अगदी किरकोळ स्वरूपाची कामे बाकी आहेत मशिनरीचे काम अद्याप बाकी आहे.नवीन वीज कनेक्शन लवकरच मिळणार आहे.
काही ठिकाणी पाईपलाईनची हायड्रोलिक टेस्टिंग सुरू आहे.पुढील तीस वर्षाचा विचार करून ही पाणीपुरवठा योजना साकारली जात आहे.या योजनेमध्ये २ लाख ५५ हजारची एक, १ लाख ७५ हजारची एक आणि ५५ हजारची एक अशा तीन पाणी टाक्या उभारल्या आहेत. याद्वारे समर्थ नगरच्या सर्वच भागात मुबलक पाणीपुरवठा केला जाणार आहे.दररोज प्रति माणसी ५५ लिटर पाणी मिळणे अपेक्षित आहे. समर्थ नगर ग्रामपंचायतीमध्ये स्थापनेपासून लोकांना पिण्यासाठी पाणी नव्हते अशा परिस्थितीमध्ये अक्कलकोट नगरपालिकेच्या सहकार्याने या ठिकाणी १५ ते २० दिवसाड पाणीपुरवठा सुरू आहे परंतु ज्यावेळी ही योजना स्वतंत्रपणे सुरू होईल त्यावेळी मात्र या ठिकाणी पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे, असे माजी सरपंच प्रदीप पाटील यांनी सांगितले.
पाणीपुरवठा योजनेच्या कामावर समाधानी
ज्या पद्धतीने पुणे ,मुंबई या मोठ्या शहरामध्ये दररोज पाणीपुरवठा होऊ शकतो त्याच धर्तीवर आमच्या समर्थनगरला रोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे त्या दृष्टीने सर्व कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत.पाणीपुरवठा योजनेचे काम मार्गी लागत असल्याने मी देखील खूप समाधानी आहे.अनेक दिवसांचा हा प्रश्न आता मार्गी लागत आहे.
– जयश्री पाटील, सरपंच समर्थनगर
समर्थ नगरला दररोज पाणीपुरवठा शक्य
अक्कलकोट शहराला देखील सध्या कुरनूर धरणातूनच पाणीपुरवठा केला जात आहे.सध्या धरणामध्ये पाणी नसल्याने अडचण आहे परंतु ज्यावेळी कुरनूर धरण शंभर टक्के भरेल त्यावेळी मात्र दोन्ही पाणीपुरवठा योजनेला अडचण येणार नाही.समर्थ नगरला तरी दररोज पाणीपुरवठा होणार आहे,अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.