मदत कार्यासाठी अक्कलकोट तालुक्यात एनडीआरएफची टीम दाखल,अडकलेल्या दीडशे लोकांना सुरक्षितस्थळी हलविले,आठ जनावरे दगावली,पूर उद्या ओसरण्याची शक्यता
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१५ : अक्कलकोट तालुक्यात बुधवारी रात्री बोरी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक लोक स्थलांतरित झाले असून या भागात बचावकार्य वेगाने सुरू झाले आहे.या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे दोन पथक देखील दाखल झाले असून अडकलेल्या १६० लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.बबलाद येथील शेतकरी प्रकाश उर्फ भैय्या कुलकर्णी यांचे चार गाई, दोन म्हैस व दोन वासरू असे एकूण आठ जनावरे मुसळधार पावसामुळे दगावले आहेत दोन शेळ्या,पन्नास कोंबड्या दगावल्या आहेत.
गुरुवारी दिवसभर एनडीआरएफच्या टीममार्फत बचावकार्य सुरू होते.या पथकासोबत आमदार
सचिन कल्याणशेट्टी,तहसीलदार अंजली मरोड,नायब तहसीलदार यांचे पथक देखील कार्यरत होते.
या सर्व परिस्थितीवर सर्वांचे बारीक लक्ष होते.बुधवारी संध्याकाळी पाच वाजता कुरनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणार असे सांगण्यात आले होते.त्यामुळे एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते.यासंदर्भात आमदार कल्याणशेट्टी यांनी बुधवारी रात्रीच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी चर्चा केली होती.त्यानुसार सकाळी हे पथक दाखल झाले.बुधवारी रात्रभर नदीकाठच्या गावातील लोकांनी रात्र जागून काढली. इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात
पाणी आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिक हवालदिल झाले होते आणि घाबरले होते. या सर्व परिस्थितीत किमान दीडशे ते दोनशे लोक अडकले होते.काही जण झाडावर कडून बसले होते. काहीजण आडोशाचा आधार घेऊन मदतीची वाट पाहत होते.

या सर्वांना सकाळपासूनच एनडीआरएफच्या पथकाने मदत करत त्यांना सुरक्षित स्थळी हलविले.यामध्ये बिंजगेर येथील तीस जण, तळेवाड येथील तीस जण,संगोगी येथील ऐंशी जण आणि रामपूर येथील पाच अशा एकूण दीडशे लोकांना बाहेर काढण्यात टीमला यश आले.अनेक ठिकाणी गाय, म्हैस, शेळया अडकले होते. त्यांनाही या टीमने मदत करत सुरक्षितस्थळी हलविण्यास मदत केली.पितापूर,हनूर, चुंगी,सांगवी, तळेवाड, ममदाबाद,संगोगी,रामपूर
या गावांना पुराचा जबरदस्त तडाखा बसला आहे. नदीकाठची सर्व पिकेही जमीनदोस्त झाली आहेत.
यात उसाचे प्रचंड नुकसान झालेले आहे. एनडीआरएफच्या पथकामध्ये वीस लोक कार्यरत आहेत. त्यांच्या दोन टीम सध्या बचाव कार्यामध्ये व्यस्त आहेत. सायंकाळनंतर कुरनूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने उद्या (शुक्रवारी) सकाळपर्यंत पूर ओसरण्याची शक्यता आहे,असे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि तहसीलदार अंजली मरोड यांनी सांगितले.
पूरस्थिती आटोक्यात आल्यानंतर सर्व पिकांचे पंचनामे होतील आणि जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू.पूर ओसरण्याची चिन्हे दिसत असली तरी हवामान विभागाने अजूनही दोन दिवस पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे लोकांनी आणखी दोन-तीन दिवस सुरक्षितस्थळीच राहावे, असे आवाहन आमदार कल्याणशेट्टी यांनी केले आहे.
प्रशासनाच्या पातळीवर आमचे सर्वतोपरी मदतकार्य सुरू असून आणखी चार दिवस सतर्कता बाळगण्याची
गरज आहे.धोका टळला नाही नागरिकांनीही आपल्या घरी जाण्यासाठी गडबड करू नये, अडचण आल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.
– इतिहासात
पहिल्यांदा असा पूर ..
कुरनूर धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा पूर आला आहे.यापूर्वी एनडीआरएफच्या टीमची कधी गरज पडली नव्हती.यावेळी मात्र इतर तालुक्यात झालेल्या पावसामुळे बोरी नदीला पूर येऊन हाहाकार उडाला
आहे.
– नुकसानभरपाई
देण्याची मागणी
या पावसामुळे केवळ नदीकाठच्या शेतीचेच नुकसान झालेले नाही तर इतर गावातही ९० टक्के नुकसान हे शेती पिकाचे झालेले आहे.त्यामुळे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.