जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्जपुरवठा केल्याप्रकरणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस ईडीने बजावली नोटीस
सातारा : कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्जपुरवठा केल्याप्रकरणी ईडीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस बजावली आहे. कारखान्याला दिलेले ९६ कोटींचे कर्ज कशाच्या आधारावर दिले? याचा खुलासा करण्याचे आदेश या नोटिसीत दिले आहेत.
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांनी लिलावात घेतला होता. हा कारखाना घेत असताना संबंधितांना चार विविध बँकांनी कर्ज पुरवठा केला होता. त्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा समावेश आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने संबंधितांना ९६ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले होते. ईडीने नुकतीच जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली होती. या कारखान्याशी संबंधित सर्व कंपन्यांची कसून चौकशी ईडी मार्फत सुरू आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज वाटपाबाबत खुलासा मागविण्यात आला असल्याने राज्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.