---Advertisement---

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांनी नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी ; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांचे आवाहन

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर, दि. 23: यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी पावसामुळे किंवा अन्य बाबींमुळे होणाऱ्या पीक नुकसानीची माहिती 72 तासामध्ये विमा कंपन्यांना द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calamities) या जोखमीच्या बाबीअंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफूटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामुळे होणाऱ्या नुकसानीपोटी विमा संरक्षण प्राप्त होते. जुलै महिन्यामध्ये राज्यातील काही भागात अतिवृष्टीने तसेच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेत पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. पीक विमा संरक्षण घेतलेल्या अधिसूचित पिकांचे उपरोक्त बाबींमुळे नुकसान झाल्यास पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक नुकसानीच्या पूर्वसूचना शेत पिकांचे नुकसान झाल्यापासून 72 तासामध्ये विहित मार्गाने विमा कंपनीस देणे आवश्यक आहे.

विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्वे नंबरनुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इंश्युरंन्स ॲप (Crop Insurance App) / संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक / बँक / कृषि व महसूल विभाग यांना कळविण्यात यावे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशील कळविणे बंधनकारक असेल.

शेतकऱ्यांनी वैयक्तिकरित्या मोबाईल ॲपद्वारे (Crop Insurance App), विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक अथवा लेखी स्वरुपात विमा कंपनीच्या तालुका/जिल्हा कार्यालयात किंवा कृषि/महसूल विभागास देणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तत्काळ नजीकच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!