---Advertisement---

नुकसानीचे पंचनामे गतीने करुन प्रस्ताव पाठवावेत,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

Follow Us:
---Advertisement---

 

सोलापूर, दि.19 :  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला आधार देण्याची गरज असून त्यासाठी लवकरात लवकर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन मदतीसाठीचे प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी आज सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिले.

सोलापुरात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी  निर्देश दिले. नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी मंत्री दादाजी भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार प्रणिती शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, नुकसान झालेल्या घरांचे, शेतीचे, जनावरांचे आणि जिवीतहानीची मा‍हिती शक्य तितक्या लवकर संकलित करुन शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवावा. हे प्रस्ताव तयार करताना महसूल, कृषि, पशुसंवर्धन या सर्व विभागांनी एकही नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीने करावेत.

हवामान विभागाने येत्या आठवड्यात आणखी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने महसूल, पोलीस, जिल्हा परिषद आणि कृषि विभागाला सज्ज राहण्याच्या सूचना द्याव्यात. पूर येण्याची शक्यता असणाऱ्या भागातील नागरिकांचे लवकरात लवकर स्थलांतर करण्यात यावे. स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांची काळजी घ्यावी. येत्या काळात पडणाऱ्या पावसात कमीत कमी मनुष्यहानी होईल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी दिल्या.

महसूल मंत्री श्री.थोरात यांनी सांगितले की, पावसामुळे पुणे विभागातील जिल्हे आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यात नुकसान झाले आहे. नुकसानीचा आढावा घेवून राज्य शासन मदतीबाबत मंत्रीमंडळ बैठकीत विचार करेल. त्यासाठी लवकरात लवकर पंचनामे करण्याची आवश्यकता आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेकडील रस्ते, पूल, पाणीपुरवठा योजना, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची नोंद देखील नुकसानीच्या अहवालामध्ये घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केल्या.

प्रारंभी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सोलापूर तसेच पुणे विभागातील पाचही जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची माहिती दिली. पुणे विभागातील सर्वाधिक जास्त नुकसान सोलापूर जिल्ह्यात झाल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी सोलापूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे सादरीकरण केले.  त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात शेती, फळबागा, रस्ते, वीज वहन यंत्रणा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. येत्या तीन चार दिवसात हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.

यावेळी बैठकीस पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिकेचे आयुक्त पी.शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जलसंपदा विभागाचे जयंत शिंदे, धिरज साळे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!