मुंबई, दि. ३ ऑगस्ट : आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका महत्वाच्या असून या निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा. बुथ कमिट्यांची बांधणी भक्कम करा आणि या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळेल यासाठी कामाला लागा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. टिळक भवन येथे जिल्हा अध्यक्ष, आमदार, सर्व सेल व विभाग प्रमुखांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
पटोले पुढे म्हणाले की, खा. राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे पक्षाला लढणारे कार्यकर्ते हवे आहेत, पक्षासाठी काम करा, कसलीही तडजोड न करता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी उंचावेल यासाठी झोकून देऊन काम करा. महाविकास आघाडीचे सरकार जनतेच्या पसंतीला उतरले असून दिड वर्षाच्या कालावधीत झालेल्या विधान परिषद निवडणुकांसह ग्रामपंचायत निवडणुकीतही काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झालेली आहे.
★ सरकारची कामे जनतेपर्यंत पोहचवा, नव्या उत्साहाने व ताकदीने कामाला लागा
या बैठकीला माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, आ. शरद रणपिसे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, किसान काँग्रेसचे शाम पांडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, वामसी रेड्डी, एनएसयुआयचे आमिर शेख, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रमोद मोरे, देवानंद पवार आदी उपस्थित होते.
★ माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश
मुंबई, दि. ३ ऑगस्ट : माजी राज्यमंत्री व वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक शिंदे यांनी टिळक भवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी नाना पटोले म्हणाले की, मविआ सरकार आल्यापासून काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढली असून हे काँग्रेस पक्ष व सरकारवरचा विश्वास दृढ करणारे आहे. शिंदे यांच्या प्रवेशाने हिंगणघाट व वर्धा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना बळकट होण्यास मदत होईल असे म्हणत पटोले यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. अजूनही विविध पक्षातील नेते काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत असेही पटोले म्हणाले.
या पक्ष प्रवेशावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री नसीम खान, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप आदी उपस्थित होते.
आज राज्यातील कॉंग्रेस चे संपूर्ण आमदार, जिल्हाध्यक्ष-शहराध्यक्ष तसेच पक्षाच्या सर्व आघाडीच्या अध्यक्षांसह पक्षाचे जेष्ठ नेते, प्रदेश चे नेते, कार्याध्यक्ष यांच्या उपस्थितीत पक्षाचे कामकाज, बुथ कमेटी, जिल्हा-तालुका कमेटी, शासकीय कमेटी, कोविड काळात मदतीबाबत आढावा बैठक घेतली. pic.twitter.com/oFedlo0oAe
— Nana Patole (@NANA_PATOLE) August 3, 2021






