ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राष्ट्रीय समाज पक्ष आगामी निवडणूक स्वबळावर लढविणार, अध्यक्ष महादेव जानकर यांची माहिती

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.३० : राष्ट्रीय समाज पक्ष एनडीए सोबत घटक पक्ष असला तरी राज्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका ह्या राष्ट्रीय समाज पक्ष स्वतंत्र लढणार असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली. सोमवारी, आमदार जानकर हे गाणगापूर येथे जाण्यासाठी अक्कलकोट येथे आले असता विश्वन्युज मराठीशी संवाद साधला.

आता लवकरच निवडणुका येतील, या निवडणुकीत आमच्या पक्षाची भूमिका काय असेल ,याकडे सर्वांचे लक्ष आहे पण मी स्पष्टपणे सांगतो की, आम्ही या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत.भाजपवर मी मुळीच नाराज नसल्याचे सांगून प्रत्येक पक्ष हा आपला पक्ष कसा वाढावा, यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी मी देखील प्रयत्न करत आहे. नाराज वगैरे मी अजिबात नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे,  त्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत, ही देखील आमच्या पक्षाची भूमिका आहे आणि जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी देखील आमचे स्पष्ट मत आहे, तशी आमची मागणी पण आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

आम्ही सध्या एनडीए सोबत घटक पक्ष आहोत. ज्या उद्देशाने आम्ही त्यांच्यासोबत गेलो त्यापैकी अनेक उद्देश सफल झाले आहेत. काही होणार आहेत त्यामुळे
सध्या तरी आम्ही त्यांच्या सोबतच आहोत.राज्यासह संपूर्ण देशात कोरोनामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली आहे. बेकारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे लोकांचे उद्योगधंदे बंद पडलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एखादी
ठोस योजना,  भूमिका घेऊन काम करावे.

विरोधाला विरोध म्हणून आमची भूमिका राहणार नाही पण काहीतरी चांगले काम त्यांनी करून दाखवावे,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगून सध्या राज्यात आमचे १२० जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आहेत. दोन आमदार आहेत, चार राज्यात पक्षाला टेक्निकल मान्यता आहे, आणखी दोन राज्यात पक्ष विस्तारत आहे. लवकरच राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळेल.

आमच्या पक्षाचा विचार लोकांना पटत आहे. त्यामुळे पक्षाचा विस्तार करण्याच्या दृष्टीने कालच वर्धापन दिनाच्या निमित्ताने मोठा मेळावा घेऊन आमची भूमिका जाहीर आहे.  येत्या आठवड्यात आम्ही राज्यात लोकांना आपले स्वतःचे अधिकार प्राप्त झाले का, यासाठी पक्षातर्फे ‘जन अधिकार यात्रा’ काढणार आहोत.

ही यात्रा प्रत्येक महापुरुषांच्या गावी जाणार आहे आणि तिथून संघर्षाची सुरुवात करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी रासपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर,  प्रसिद्धीप्रमुख दत्ता माडकर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!