ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ई पीक पाहणी अॅपमुळे पिकांचे तालुक्यातील अचूक क्षेत्र कळणार,  तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांची माहिती

अक्कलकोट : महसूल विभागाकडून सध्या राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्प राबवण्यात येत आहे.या ई पीक पाहणी अॅप मुळे पिकांचे तालुक्यातील अचूक क्षेत्र कळणार आहे.महसूल विभाग आणि कृषी विभाग यांनी समन्वयाने हा ई-पीक पाहणी प्रकल्प यशस्वी करा, असे तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी सांगितले. अक्कलकोट नवीन तहसील कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना तहसीलदार सिरसट म्हणाले की, या ई-पीक पाहणी प्रकल्पाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या अॅपद्वारे शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद,शेतकऱ्यांचे उत्पादन,  शेत जमिनीची प्रतवारी,  दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होणार आहे. म्हणूनच ई पीक पाहणी शेतकऱ्यांसाठी एक मोठे वरदान असल्याचे तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी सांगितले.

यावेळी नायब तहसीलदार संतोष कांबळे म्हणाले की, या मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील, तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रियल टाइम माहिती अप्लिकेशनमध्ये संकलित होणार आहे. या ई पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होणार असल्याचे सांगितले. यावेळी नायब तहसीलदार संतोष कांबळे,निवडणूक संकलन प्रमुख जी.व्ही हिरेमठ आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!