अक्कलकोट पालिकेत भाजप विरुद्ध महा विकास आघाडी सामना रंगण्याची चिन्हे, भाजपमधील असंतुष्टांवर काँग्रेसचा ‘डोळा’
मारुती बावडे
अक्कलकोट : राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिल्यानंतर अक्कलकोट पालिकेत आता निवडणूक विषयीच्या हालचालींना वेग आला आहे.सध्या घडीला अक्कलकोट नगरपालिकेत सत्ताधारी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना रंगेल अशी चिन्हे दिसत आहेत.
भाजपमध्येही दोन गट असल्याने एक गट जर बाहेर पडला तर मात्र भाजपासाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अक्कलकोटमध्ये सध्या भाजपचे १५ काँग्रेसचे ६ , राष्ट्रवादी काँग्रेसचे १ आणि अपक्ष १ असे प्रत्येक पक्षाचे संख्याबळ आहे.
अक्कलकोट नगरपालिकेचा इतिहास जर पाहिला तर आतापर्यंत सर्वाधिक काळ भाजपचे वर्चस्व राहिले आहे. सध्याही नगराध्यक्ष भाजपचाच आहे पण त्यांच्या विरोधात एक गट कार्यरत असल्याने तो गट नेहमी कामकाजामध्ये अडथळा निर्माण करत असतो, असा त्यांच्याकडून आरोप होत आहे. यावरून या दोन्ही गटांमध्ये सतत विविध मुद्यांवरून खटके उडाले आहेत.
मागच्या निवडणुकीमध्ये बसलिंगप्पा खेडगी आणि महेश हिंडोळे यांच्यामध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी चुरस दिसून आली होती. यामध्ये खेडगी यांनी बाजी मारली होती. आता मात्र खेडगी हे आमदार कल्याणशेट्टी यांच्यापासून चार हात लांब असल्याने त्यांची भाजपमधील पुढची वाट बिकट मानली जात आहे. त्यात खेडगी हे माजी पालकमंत्री विजय देशमुख समर्थक मानले जातात.त्यामुळे
ते आता वेगळ्या वाटेच्याच शोधात आहेत.
जर ते बाहेर पडले तर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर मतविभागणी होऊ शकते. त्यानंतर भाजपमध्ये महेश हिंडोळे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. ते भाजपमध्ये सध्या एक ज्येष्ठ नगरसेवक आहेत. अनुभव त्यांचा दांडगा आहे. मागच्या वेळी संधी असताना त्यांना दिली गेली नाही, असे त्यांचे मत आहे. त्यांची
आता नगराध्यक्षपदाची महत्वकांक्षा आहे . मागच्यावेळी संधी हुकल्याने ते यावेळी पूर्ण ताकतीनिशी मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत.
सध्या पक्षीय वातावरणावर एक नजर टाकली तर भाजप, रिपाई ,रासप हे पक्ष एकीकडे दिसत आहेत तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकीकडे दिसत आहेत. सध्या तरी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप
असा सामना होणार आहे. त्यात तिकीट वाटपावेळी जर काही अनपेक्षित घटना घडल्या तर मात्र त्याचा फायदा प्रतिस्पर्धी पक्षाला होऊ शकतो,असे जाणकारांचे मत आहे.
भाजपकडे सध्या नव्या लोकांची फौज मोठया प्रमाणात आहे. त्यामुळे निष्ठावंत आणि जुन्या लोकांची अडचण होत असून तेही आता मिळेल त्या पक्षाकडून संधीच्या शोधात दिसत आहेत. याचा विचार करावा लागणार आहे. असे जर झाले तर भाजपला मतविभागणीचा फटका बसू शकतो.
आमदार सचिन कल्याणशेट्टी हे आमदार झाल्यापासून पहिल्यांदाच नगरपालिका निवडणुकीला सामोरे जात आहेत. सत्ता अबाधित ठेवण्याबरोबरच भाजपाला नव्या आणि जुन्या अशा दोन्ही लोकांची सांगड घालून निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे.
दुसरीकडे काँग्रेस मात्र भाजपच्या चुकांच्या शोधात आहे. आतापासूनच भाजपमधील काही असंतुष्ट मंडळींना जवळ करत त्यांच्यावर ‘डोळा’ ठेवला आहे. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना प्रदीर्घ काळ राजकारणाचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाची कसोटी या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.
मागच्यावेळी याठिकाणी काँग्रेसला अतिशय कमी जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावेळी जास्त जागा मिळवण्याचे आव्हान त्यांच्यासमोरही राहणार आहे. भाजपमध्ये गटबाजी जास्त असल्याने कोणत्या वेळी काय घडामोडी
घडू शकतात, हे सांगता येणे कठीण आहे.