एकरुख उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी शंभर कोटींचा निधी द्या ; माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी घेतली जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट
अक्कलकोट, दि.१ :अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी वरदायिनी असलेल्या एकरुख उपसा सिंचन योजनेच्या उर्वरित कामासाठी १०० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली.
याबाबतचे निवेदन देऊन त्यांनी बैठक लावण्याची विनंती केली. बुधवारी माजी मंत्री म्हेत्रे यांनी अक्कलकोटच्या शिष्टमंडळासह पाटील यांची भेट घेतली. आणि या विषयावर सविस्तर चर्चा केली. अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे.
एकरुख उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक एक व दोन सप्टेंबर २०२० मध्ये कार्यान्वित झाला आहे. योजनेचे मुख्य कालवे झाले आहेत. परंतु वितरण व्यवस्थेची कामे अद्याप बाकी आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वितरण व्यवस्थेची कामे पूर्ण करण्यासाठी पुढील दोन वर्षांमध्ये १०० कोटी लागणार आहेत.
कालव्याची कामे पूर्ण होऊन ७ हजार २०० क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. व २१ गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. तरी एकरूख उपसा सिंचन योजनेच्या कालव्याची कामे पूर्ण करण्याचे आदेश आपण द्यावेत आणि १०० कोटीची तरतूद करून हा निधी तालुक्याला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आपण जलसंपदा मंत्री पाटील यांच्याकडे केली असल्याचे म्हेत्रे यांनी “विश्व न्यूज मराठीशी” बोलताना सांगितले.
त्याशिवाय अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदीवर आठ कोल्हापुरी बंधारे आहेत. त्यातील बबलाद येथील कोल्हापुरी बंधारा राज्याच्या सीमेलगत आहे. दरवर्षी बोरी नदीतून अतिरिक्त विसर्ग कर्नाटक राज्यात जात आहे. बबलाद कोल्हापुरी बंधाऱ्याचे रूपांतर बॅरेजसमध्ये केल्यास पाणीसाठा मध्ये वाढ होईल आणि शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे या बंधाऱ्याचे रूपांतर बॅरेजसमध्ये करावे, अशी मागणी देखील आपण त्यांच्याकडे केली आहे.
बॅरेजमध्ये रूपांतर करण्याचे सर्वेक्षण व अंदाजपत्रक बाबत संबंधितांना आदेश देण्यात यावेत तसेच या कामासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात यावी अशी मागणीही आपण केली आहे, असे म्हेत्रे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, महेश वानकर, मोहन देडे, शिवराज स्वामी आदी उपस्थित होते.
★ लवकरच बैठक लावू
अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदीवर मागणी करण्यात आलेल्या बॅरेजेससाठी
व अन्य जलसंपदा विभागाच्या संबंधित असलेल्या कामासंदर्भात आपण लवकरच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बैठक लावणार आहे आणि हे सर्व प्रश्न मार्गी लावणार आहे- सिद्धाराम म्हेत्रे,माजी आमदार