अक्कलकोट, दि.२९ : कुरनूर धरणातून बुधवारी सकाळी विसर्ग कमी झाल्याने तब्बल १८ तासानंतर बोरी उमरगेचा पूल खुला झाला आहे. त्यामुळे अक्कलकोट ते गाणगापूर रस्त्यावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू झाली आहे.
दुधनी,मैंदर्गीकडे जाणारी वाहतूक सुरू झाली आहे. त्याशिवाय नदी परिसरात असलेले छोटे रस्ते देखील पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने खुले झाले असून जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
दरम्यान आंदेवाडी गावाला अद्यापही पाण्याचा विळखा असून तो उद्या पर्यंत कमी होईल. त्या ठिकाणी युद्धपातळीवर प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्या ठिकाणी पाणी आणि वैद्यकीय सुविधा या सज्ज ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी दिली.
कुरनूर धरणातून सायंकाळी पुन्हा विसर्ग कमी करण्यात आला आहे. १२०० क्युसेक पाणी हे सध्या धरणातून खाली सोडण्यात येत असल्याची माहिती पाटबंधारे अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे बोरी नदी वरील जे रस्ते पाण्याखाली गेले होते ते सर्व रस्ते जवळपास खुले झाले आहेत,अशी माहिती तहसीलदार शिरसट यांनी दिली.
सध्या तरी पाण्याचा विसर्ग हा कमी झालेला आहे परंतु पावसाची शक्यता अद्याप कायम आहे त्यामुळे नागरिकांनी कायम सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. नागरिकांच्या अडचणी साठी तालुका तहसील कार्यालयात आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून या संदर्भात नागरिकांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.