---Advertisement---

‘अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर बनू नका’ : हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात !

By team
On: March 9, 2026 11:03 AM
Follow Us:
---Advertisement---

हिंगोली :  वृत्तसंस्था

केंद्र सरकारने अमेरिकेशी केलेल्या व्यापार करारावरून काँग्रेसने पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधत, “अमेरिकेशी व्यापार करार करून केंद्र सरकार अक्षरशः शरण गेले आहे. त्यांनी अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर न होता ठामपणे भारताची भूमिका मांडावी,” असे स्पष्टपणे म्हटले.

सपकाळ यांच्या नेतृत्वात आज हिंगोली येथे भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात ‘शेतकरी संघर्ष पदयात्रा’ काढण्यात येत आहे. या पदयात्रेत हिंगोलीसह आसपासच्या जिल्ह्यांतील हजारो शेतकरी, शेतमजूर आणि नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली. पदयात्रेपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना सपकाळ यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली.

ते म्हणाले की, केंद्र सरकारने अमेरिकेशी व्यापार करार केल्यानंतर देशातील विविध शेतमालांच्या किंमती घसरल्या आहेत. फळबागायती उत्पादनांनाही याचा मोठा फटका बसत असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. “सरकार ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असून त्यांनी जणू हा देश अमेरिकेकडे विकण्यास काढला आहे,” असा आरोप त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर, महिला, आदिवासी आणि मागासवर्गीय समाजातील लोकांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी हिंगोलीत ही पदयात्रा आयोजित करण्यात आली असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. “सरकारला जाग यावी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, हा या आंदोलनामागील उद्देश आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सपकाळ यांनी देशातील इंधनदरवाढीवरही टीका केली. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर कमी असताना त्याचा फायदा भारतीय नागरिकांना दिला जात नाही, मात्र तुटवड्याची परिस्थिती निर्माण होताच दरवाढ केली जाते, असे ते म्हणाले. गॅस दरवाढीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर टीका करत “सरकार भांडवलदारांना अनुकूल निर्णय घेत आहे,” असा आरोप केला.

केंद्र सरकारकडे कोणतेही ठोस आंतरराष्ट्रीय धोरण नसल्यामुळे देशाला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे, असेही सपकाळ यांनी म्हटले. “सरकारने संसदेत या विषयावर चर्चा करावी, विरोधकांना आणि जनतेला सोबत घेऊन निर्णय घ्यावेत,” असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, रविवारी सपकाळ यांनी सोशल मीडियावर ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये मोदी ट्रम्प यांना ‘सर, मी एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत वाढवू शकतो का?’ असे विचारत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या पोस्टवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसून आल्या.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!