अक्कलकोट : दरवर्षी पुरामुळे सांगली बुद्रुक गावाला तडाखा बसत आहे नदीकाठची घरी आहेत ती पाण्याखाली जात आहेत त्यामुळे या गावाची पुनर्वसनाची मागणी ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे. आतापर्यंत अनेक नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत. पण प्रत्यक्षात काहीच कृती नसले नाही. ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. त्याशिवाय नदीला पूर आल्यानंतर सांगवी बु व काळेगावचा संपर्क तुटत असतो.
दरम्यान यावर्षी या गावाची स्थिती तशीच आहे. नऊ घरांमध्ये यावर्षी पाणी शिरले आहे. पाणी जास्त आल्यास संपूर्ण गावाला धोका आहे. या पार्श्वभूमीवर सांगवी बु , रामपूर, आंदेवाडी या सर्व गावांची पुरसदृश्य स्थितीची पाहणी करण्यासाठी सहाययक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, प्रांताधिकारी सुप्रिया डांगे, तहसीलदार बाळासाहेब सिरसट, आमदार सचिन कल्याणशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, वागदरी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्यासह अनेक आधिकारी व लोकप्रतिनिधींनी याची पाहणी केली व नागरिकांचे म्हणणे ही ऐकून घेतले.व संबंधिताना सूचना केल्या.
याबद्दल बोलताना सरपंच वर्षा भोसले म्हणाल्या की, गतवर्षीच्या पुराची पुनरावृत्ती झाली आहे. आम्ही रातोरात नदीकाठच्या सर्व घरांना स्थलांतरित केले आहे.गेल्या वर्षी जनावरे, कोंबड्या, अन्न धान्य जीवनावश्यक वस्तू हलविताना दमछाक झाली होती. यावर सर्व प्रशासनाला आम्ही गावकऱ्यांच्यावतीने सांगवी बु गावचे तत्काळ पूर्वसन करावे,अशी आमची मागणी आहे.
गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे आदींनी भेट देऊन सांगवी बु जलाशय व गावात पाणी घुसलेल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. यावर्षी पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होत आहे. त्यावेळी, तत्कालीन सरपंच अबूबकर शेख यांनी मुख्यमंत्री यांना लेखी निवेदन देऊन गाव पूर्वसनाची मागणी केली होती. पण प्रशासनाने तो फक्त देखावाच केला, असा आरोप त्यांनी केला आहे. पुरामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावांतील कित्येक पिके वाहून गेली आणि यातून अतोनात नुकसान झाले आहे. पिकांचे तत्काळ पंचनामे व्हावे,असे विष्णू भोसले यांनी सांगितले.
पुनर्वसनासाठी जमीन देण्यास तयार
सांगवी हे गाव धोक्याच्या स्थितीत असून गतवर्षी पासून याला पुराचा धोका बसत आहे. या गावचे पुनर्वसन होणे अत्यंत गरजेचे आहे.त्यासाठी सर्व्हे करावा. गाव पुनर्वसनासाठी मी माझी स्वतःची ११ एकर जमीन अधिग्रहणसाठी तयार आहे – बाळासाहेब भोसले,मेजर सांगवी बु