ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सांगवीची मोरी उघडण्यावरून पाटबंधारे व पालिकेत टोलवाटोलवी ; तहसीलदारांची बैठक होऊनही मार्ग निघेना

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील संस्थानकालीन बंधाऱ्याची मोरी उघडण्याचा मुद्दा आता चांगलाच ऐरणीवर आला आहे.  याबाबत बैठक घेऊन ही तोडगा निघत नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे सदस्य आनंद तानवडे आणि बाळासाहेब मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर बैठक घेण्याचे आदेश देण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर आज अक्कलकोट तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार बाळासाहेब शिरसट, मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये हा बंधारा नगरपालिकेच्या अखत्यारीत आहे.  त्यामुळे ती मोरी उघडण्याचा आणि त्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा त्यांचा आहे तो त्यांनी करावा, असे पाटबंधारे विभागाचे मत आले.

या बैठकीत पाटबंधारे विभागाने या कामाचे अंदाजपत्रक तयार करावे आणि ते पालिकेला सादर करावे त्याचा खर्च पालिकेने द्यावा आणि हे काम पाटबंधारे विभागाने करून द्यावे असा निर्णय झाला परंतु मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मासेमारी व जलाशयावरील पालिकेची तसेच शेतकऱ्यांची सर्व पाणीपट्टी ही पाटबंधारे विभाग घेते. बंधाऱ्याची मालकी जरी नगरपालिकेची असली तरी त्यावरची आर्थिक मलई मात्र पाटबंधारे विभाग घेते त्यामुळे पाटबंधारे विभागाने याचा खर्च करावा,असे मत नगरपालिकेचे आहे.

या दोघांच्या वादांमध्ये सांगवीकरांना मात्र वेठीस धरले जात आहे. यावर मुख्याधिकारी सचिन पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, हा विषय जीबी समोर ठेवला जाईल त्यानंतरच यावरचा अंतिम निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावर बोलताना आनंद तानवडे म्हणाले की, कोण करावे हा मुद्दा महत्त्वाचा नाही तर सांगवीच्या लोकांना होणारा जो त्रास आहे तो कमी झाला पाहिजे आणि जर तो नाही झाला तर यापुढे आणखी आक्रमक भूमिका पण घेऊ असे ते म्हणाले. बाळासाहेब मोरे यांनीही
या मुद्याला हात घालत त्यांनीही तातडीने मोरी खुली करून पाणी सोडून देऊन सांगवीकारांचा धोका कमी करावा, अशी मागणी प्रशासनासमोर केली.

या बैठकीला तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब मोरे,पाटबंधारे अधिकारी प्रकाश बाबा, मलिक बागवान, प्रदीप सलबत्ते, प्रवीण घाटगे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!