लिंगायत वाणी उल्लेख असणाऱ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, नगर पालिकेचे पक्षनेते महेश हिंडोळे यांचे पत्रकार परिषदेत आवाहन
अक्कलकोट,दि.२० : लिंगायत वाणी हे ओबीसी,एसबीसी आणि बीसी या प्रवर्गात लाभधारक ठरू शकतात म्हणून लिंगायत समाजाने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपरिषद पक्षनेते नगरसेवक महेश हिंडोळे यांनी पत्रकार परिषदेत केले.
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाने आपल्या अहवाल क्रमांक ४६ व ४७ च्या अनुषंगाने मागास वर्ग व विशेष मागास वर्ग यादीमध्ये नवीन जातींचा समावेश करणे आणि दुरुस्ती करणे बाबत शिफारस केली होती. महाराष्ट्र शासनाने दिनांक ४/९/२०१४ च्या निर्णयाने लिंगायत सोनार, गुरव, जंगम ,कुंभार, न्हावी, परीट, धोबी, फुलारी, सुतार, तांबोळी, साळी, कोष्टी, देवांग, वाणी आणि कुल्लडगी या जातींचा नव्याने ओबीसी आणि एसबीसी प्रवर्गात समावेश केला आहे.
विरशैव लिंगायत आणि हिंदू लिंगायत अशा नोंदी असल्याने त्या लिंगायत समाज बांधवांना ओबीसी किंवा एसबीसी या प्रवर्गाचा लाभ मिळत नाही म्हणून अशा लिंगायत समाज बांधवांनी आपले आजोबा पणजोबा यांचे दाखले माहिती अधिकारात काढावेत, त्यावर वाणी असा उल्लेख असेल तर त्यांना या सवलतीचा लाभ मिळू शकतो. अक्कलकोट संस्थान कालीन दाखले नोंदीमध्ये अतिशय सुस्पष्टपणे वाणी असा उल्लेख आहे इतकेच नव्हे तर देवीची लस केव्हा टोचली याचाही उल्लेख आढळतो परिणामी संस्थानकालीन दाखला हा लिंगायत समाजासाठी सवलती मिळवण्यासाठी वरदान ठरणार आहे.
तेव्हा लिंगायत समाज बांधवांनी दाखला मिळवण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी स्वातंत्र्यपूर्व काळात १९०४ साली अक्कलकोट नगरपरिषदेची स्थापना अक्कलकोट राजघराण्याने केली आहे. तसेच सेंट्रल स्कूल आणि संस्थान कालीन जिल्हा लोकल बोर्ड अंतर्गत विविध शाळा, तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि नोंदणी कार्यालय या ठिकाणी सदरचे दाखले मिळू शकतात संस्थानकालीन दस्तऐवजांचे हस्तांतरण करण्यात आले आहे. नगर परिषद आणि सेंट्रल स्कूल येथे असे दाखले मिळाल्याचे पुरावे महेश हिंडोळे यांनी पत्रकार परिषदेत सादर केले.
तेव्हा समाज बांधवांनी शैक्षणिक आणि राजकीय निवडणूक लढवताना ओबीसी आणि एसबीसी दाखल्याचा लाभ होणार असल्याने जागृत होऊन दाखले मिळवावेत व सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक महेश हिंडोळे यांनी केले आहे.या पत्रकार परिषदेला नगरसेवक कांतु धनशेट्टी, दयानंद बिडवे नागराज कुंभार,स्वामीनाथ घोडके आदी उपस्थित होते.