ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घ्यावा: पालकमंत्री भरणे ; सोलापूर विद्यापीठातून विशेष लसीकरण मोहिमेची सुरुवात

सोलापूर, दि.25- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाकडून मिशन युवा स्वास्थ्य उपक्रमांतर्गत कोविड विशेष लसीकरण मोहिमेची सुरुवात विद्यापीठ व महाविद्यालयांतून करण्यात येत आहे. येत्या 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमाचा 18 वर्षापुढील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन कोविशिल्ड व कोवॅक्सिन लस घ्यावे, असे आवाहन सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

सोमवारी, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मिशन युवा स्वास्थ उपक्रमांतर्गत कोविड-19 विशेष लसीकरणाची सुरूवात पालकमंत्री श्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. यावेळी प्र-कुलगुरू डॉ देबेंद्रनाथ मिश्रा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पी. शिवशंकर, जिल्हा आरोग्य अधिकारी शितलकुमार जाधव, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, डॉ. सायली शेंडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांनी सर्वांचे स्वागत केले. विद्यापीठाचे आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित जगताप यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

पालकमंत्री भरणे म्हणाले की, कोरोनाचे संकट आणखीन गेले नाही. कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी व आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी पालकमंत्री श्री भरणे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत चहाचाही आस्वाद घेतला. लस घेतलेल्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटपही यावेळी झाले.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, 20 ऑक्टोंबर 2021 पासून महाविद्यालयातील प्रॅक्टिकल वर्गांना सुरुवात झाली आहे. लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील वर्गांत बसण्यासाठी प्रवेश देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या चांगल्या स्वास्थासाठी कोविड प्रतीबंधक लसीकरण मोहीम 25 ऑक्टोंबर ते 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत चालणार आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणात लसीकरणाची व्यवस्था विद्यापीठ संलग्न महाविद्यालयात करण्यात येत आहे. याचा विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!