मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून आज त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल देशमुख यांना याआधी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द करत देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवलं. दरम्यान, आज त्यांची कोठडी संपणार होती. त्यामुळे ईडीने त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्याकडून शंभर कोटींची वसुली केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी ईडीने तपास करत अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते.
ईडीने पाच वेळा समन्स बजावूनदेखील अनिल देशमुख आले नव्हते. अनिल देशमुख यांच्याकडून कायदेशीर मार्ग अवलंबण्यात येत होते. त्या दरम्यान ते अज्ञातवासात होते. अखेर काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर १३ तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर त्यांना पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली होती.
दरम्यान अनिल देशमुख यांचे वय आणि त्यांना असलेले आजार लक्षात घेता घरचे जेवण मिळावे ही विनंती त्यांचे वकिल अनिकेत निकम यांनी केली होती. मात्र घरचे जेवन देण्याला न्यायालयाने मंजुरी दिलेली नाही अशी माहिती मिळाली आहे. अनिल देशमुख यांना पाठीचा त्रास असल्याने त्यांना जमीनवर झोपताना पाठिला त्रास होत आहेत. त्या़ंचे वय आणि डाँक्टरांचा सल्ल्यानुसार बेडची मागणी मान्य करावी, असे अनिल देशमुख यांचे वकिल इंद्रपाल सिंह यांनी अर्ज केला आहे.