ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘अग्निहोत्रा’ तील राखेतून होणार जलशुद्धीकरण, संशोधनातून आले समोर !

मारुती बावडे

अक्कलकोट  : अग्निहोत्र यज्ञ आधारित रक्षा अर्थात अग्निहोत्र भस्म वापरून पाण्यातील क्षार किंवा जड धातू तसेच कीटकनाशके नष्ट करण्याच्या प्रक्रियेला नुकतीच भारतीय पेटंट कार्यालयाने मंजुरी दिली आहे. जगभरात यापूर्वी यावर अनेक संशोधन झाले आहे परंतु या नव्या संशोधनामुळे शिवपुरीचे नाव पुन्हा एकदा वैज्ञानिक दृष्ट्या प्रबळ झाले आहे. संबंधित शोधकार्य हे डॉ. प्रणय अभंग (पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख, डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, पिंपरी, पुणे), डॉ. प्रमोद मोघे (निवृत्त शास्त्रज्ञ, राष्ट्रीय रसायनिक प्रयोगशाळा, पुणे) व डॉ. गिरीश पाठाडे (निवृत्त प्राचार्य) यांनी केले आहे.

अग्निहोत्र हा यज्ञातील सर्वात सोपा प्रकार आहे. अग्निहोत्रासाठी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या, हातसडीचे तांदूळ, गाईचे तूप, तांब्याचे विशिष्ट आकाराचे पात्र, तसेच निश्चित स्थानानुसार सूर्योदय व सूर्यास्ताची वेळ आणि दोन सोपे मंत्र, या गोष्टी आवश्यक असतात. अगदी १० मिनिटांत होणार हा यज्ञविधी कोणत्याही स्थळी करता येऊ शकतो. अग्निहोत्र यज्ञ आधारित रक्षा वापरून पाण्यातून विविध ३८ पर्यावरण घातक कीटकनाशके तसेच विविध १८ जड धातू नष्ट करण्यात या शास्त्रज्ञांना यश आले आहे.

अग्निहोत्र यज्ञ आधारित राख पाण्यातून ८० ते ९५ टक्के कीटकनाशके व जड धातू शोषून घेते आणि पाणी शुद्ध करण्यास मदत करते.  हा शोध सांडपाण्यातून तसेच प्रदूषित भूतलावरील पाण्यातून कीटकनाशके व जड धातू शोषून घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. संशोधनामुळे अग्निहोत्र प्रक्रियेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अक्कलकोट येथील शिवपुरी येथे अग्निहोत्राचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. या संशोधनामुळे या प्रक्रियेला आणखी बळ मिळेल, असे डॉ.प्रणय अभंग (पुणे) यांनी सांगितले.

अग्निहोत्राचे परिणाम व प्रयोगाची उद्दिष्टे

१. अग्निहोत्राच्या धुराचे सभोवतालच्या सूक्ष्मजंतुंवर परिणाम
२. अग्निहोत्राच्या धुराचे हवेतील ऑक्साइडवर परिणाम
३. अग्निहोत्र धूर व राखेचे रोपांच्या वाढीवर परिणाम
४. अग्निहोत्र राखेचे औषधी गुणधर्म
५. पाणी शुद्धीकरणासाठी अग्निहोत्र राखेचा वापर

अग्निहोत्राला वैज्ञानिक दृष्टिकोन

अनेक यज्ञावर संशोधन सुरू आहेत.वैज्ञानिक दृष्ट्या हे सिद्ध झाले आहे त्यामुळे आज हजारो लोक अग्निहोत्राचा अवलंब करीत सुखी जीवन जगत आहेत.अग्निहोत्र ही एक खुप साधी आणि सोपी प्रक्रिया आहे डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले,अध्यक्ष विश्व फाउंडेशन,शिवपुरी

वातावरण शुद्धीसाठी पण आवश्यक

वातावरण शुद्धीसाठी, पाऊस पडण्यासाठी, तसेच इतर अनेक उद्दिष्टांनी अग्निहोत्र सारखे विविध यज्ञ (सोमयाग यज्ञ, श्रीसूक्त यज्ञ, इ.) केले जातात. हे यज्ञ मनुष्यबळ, यज्ञसामुग्री, जागा, वेळ इ. बाबींत भिन्न आहेत. अग्निहोत्र इतर यज्ञांच्या तुलनेत अतिशय साधा सोपा यज्ञ आहे. अग्निहोत्राचे विधी कोणताही मनुष्य स्वतः किवा समूहात करू शकतो,त्याकरिता
कोणतीही अट नाही – डॉ.प्रमोद मोघे,निवृत्त शास्त्रज्ञ

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!