---Advertisement---

अक्कलकोट तालुक्यात आगामी निवडणुकीत एक जि.प गट वाढणार ?

Follow Us:
---Advertisement---

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.५ : अक्कलकोट तालुक्यात येत्या काही महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यात एक गट आणि दोन गट वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून तशा प्रकारच्या हालचाली प्रशासकीय स्तरावर सुरू झाले आहे. यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याबरोबरच इच्छुकांनाही संधी मिळणार आहे.

तालुक्यात ६ गट आणि १२ पंचायत समिती गण सध्या कार्यरत आहेत. पूर्वी एका गटाला ४० हजार लोकसंख्येचा निकष होता आणि पंचायत समिती गणाला २० हजार लोकसंख्येचा निकष होता पण मिळालेल्या माहितीनुसार आता नवीन जो निकष आहे तो ३० हजार लोकसंख्येला एक गट आणि १५ हजार लोकसंख्येला एक गणाचे कार्यक्षेत्र राहणार आहे.त्यामुळे सध्याच्या गटांचे विभाजन होऊन या गटामध्ये एक गटाची भर पडून दोन पंचायत समिती सदस्य देखील वाढणार आहेत. महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीत सदस्य संख्या वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य सरकारने या बाबतीतही हालचाली सुरू केल्या आहेत. तसे तोंडी आदेश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. त्यामुळे निवडणूक विभागाकडून याबाबत हालचालींना वेग येत आहे.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या आधी हे काम पूर्ण होऊ शकते. अनेक वेळा इच्छुकांची संख्या जास्त झाल्यावर संधी देणे राजकीय पक्षाला अवघड जाते. यावेळी मात्र सर्वच राजकीय पक्षांना एक गट आणि दोन गणा मध्ये प्रत्येक पक्षाला तीन उमेदवारांना संधी देणे शक्‍य होणार आहे. याचा इच्छुकांना देखील फायदा होणार आहे तसेच काही गटांमध्ये गावांची संख्या जास्त असल्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्यांना निधी देतानाही अडचणी निर्माण होत होत्या. आता या नव्या निर्णयामुळे गावांची संख्या कमी होऊ शकते.त्यामुळे विकास कामातील अडचणी कमी होणार आहे पण कोणत्या गटाचे विभाजन होणार आणि कोणत्या गणाची गावे कोणत्या गटाला जोडली जाणार हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. यावर कोणतीही नियमावली शासनाने अजून जाहीर केलेली नाही परंतु याच्या हालचाली मात्र प्रशासकीय स्तरावर सुरू झालेले आहेत.

यावर राजकीय नेतेमंडळींनीमध्ये देखील चर्चा सुरू असून प्रत्येकाला आपल्या गटाबद्दल आणि गणाबद्दल उत्सुकतेबरोबरच चिंता लागली आहे.सध्याच्या आकडेवारीवर जर एक नजर टाकली तर चपळगाव ३८ हजार ८५३,वागदरी ३८ हजार ७३,जेऊर ४२ हजार ५७०,मंगरूळ ४५ हजार ७५८,नागणसूर ४२ हजार १५७,सलगर ४३ हजार ४३९ असे ६ गट मिळून २ लाख ५० हजार ८९० लोकसंख्या आहे. यातून आता कोणत्या गटाचे विभाजन होऊन नवा गट आणि गण अस्तित्वात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेते मंडळींना लागली उत्सुकता

अक्कलकोट तालुक्यात आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका तसेच बाजार समितीच्या निवडणुका होणार आहेत.या निवडणुकांमध्ये वर्चस्व मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अशात गट विभाजनाचा मुद्दा समोर आल्याने सर्वच नेते मंडळींचे या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

तीन गट सर्वाधिक लोकसंख्येचे

मंगरूळ ४५ हजार ७५८,सलगर ४३ हजार ४३९ तर जेऊर ४२ हजार ५७० हे तीन गट सध्या मोठे आहेत. त्यामुळे या गटाचे विभाजन होणार का याची चर्चा सुरू झाली आहे.याबाबत अधिकृत माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!