दिल्ली : जगप्रसिद्ध पनामा पेपर्स प्रकरणात बच्चन कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पनामा पेपर्स लीक प्रकरणी ऐश्वर्या राय बच्चनला ईडीने समन्स बजावले आहे. पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबाचे नाव समोर आले होते. या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला दिल्लीतील लोकनायक भवन येथे आज ईडीसमोर हजर होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या अधिकाऱ्यांनी आधीच प्रश्नांची यादी सुद्धा तयार केली आहे. पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे पाचशे लोकांचा समावेश होता. यामध्ये अभिनेते, खेळाडू, व्यापारी अशा प्रत्येक वर्गातील प्रमुख व्यक्तींची नावे आहेत. या लोकांवर कर चुकवेगिरीचे आरोप आहेत.
महिनाभरापूर्वी याप्रकरणी अभिषेक बच्चन यांचीही चौकशी सुरू झाली होती. पनामा पेपर्स प्रकरणाची अनेक दिवसांपासून चौकशी सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासात देशातील अनेक बड्या व्यक्तींचा समावेश केला आहे. या प्रकरणी महिनाभरापूर्वी अभिषेक बच्चनही ईडी कार्यालयात गेले होते. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना काही कागदपत्रेही दिली आहेत. अमिताभ बच्चन यांनाही या प्रकरणी ईडी नोटीस देऊन बोलावणार आहे.