मुंबई दि. २१ डिसेंबर – पेपरफुटीचे प्रकरण सीबीआयकडे तपासाला देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का? माजी गृहमंत्र्यांचा राज्यातील पोलिस यंत्रणेवर विश्वास नाही का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
म्हाडा, आरोग्य, ग्रामविकास विभागाच्या पेपरफुटीची प्रकरणे समोर आली आहेत. परीक्षा आयोजन करणाऱ्या कंपन्यांची चौकशी सुरू असून ही चौकशी सीबीआयला देण्याची मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारले आहे. राज्यसरकारने या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करुन पुढील कोणतीही कामे देण्यात येऊ नये, असा निर्णय घेतला आहे. या तपासाचे धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचले आहेत. व्यापम घोटाळ्यातील लोक यात सहभागी असल्याची शंकाही नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केली.
आधीच्या सरकारने या कंपन्यांचे एक पॅनेल तयार केले होते. यातून अनेक भरत्या करण्यात आल्या. पेपरफुटीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. कौस्तुभ धौसे या दलालाने या कंपन्यांना पोसण्याचे काम केले. याचा तपास सुरु असून २०१८ मधील काही गोष्टीही समोर आल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. या कंपन्यांनी ज्या भरत्या घेतल्या आहेत त्याचा सखोल तपास करुन दोषींवर निश्चित कारवाई होईल, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.