सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील, तर नुसती दिलगिरीच नाही, तर मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो – भास्कर जाधव
मुंबई : शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये तुंबळ खडाजंगी पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात नक्कल करत अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर केला. तसेच भास्कर जाधव यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
आमदार भास्कर जाधव यांनी दोनवेळा उठून उभं राहात मी कोणताही असंसदीय शब्द वापरलेला नाही त्यामुळे मी माझे शब्द आणि अंगविक्षेप मागे घेतो असं सांगितलं. मात्र त्यांनी माफी मागितली नाही. ज्यामुळे विधानसभेत चांगलाच गदारोळ पाहण्यास मिळाला.
देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांनी माफी मागावी अशी मागणी केल्यानंतर गोंधळ सुरू झाला. तेव्हा सभागृह काही काळ तहकूब करण्यात आलं. त्यानंतर सभागृह सुरू होताच भास्कर जाधवांनी बिनशर्त माफी मागितली. साभागृहाचं कामकाज सुरळीतपणे चालायचं असेल आणि मी पंतप्रधानांबद्दल बोलल्यामुळे सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील, तर नुसती दिलगिरीच नाही, तर मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो. जे पंतप्रधान पूर्वी बोलले होते, तोच मी उल्लेख केला, तरी देखील मी माफी मागतो”, असं भास्कर जाधव म्हणाले.
“मी माफी मागावी असा आग्रह विरोधी सदस्यांकडून होत आहे. अशा प्रकारचे प्रसंग या सभागृहात अनेकवेळा आले. एखाद्या गोष्टीसाठी माफी मागितल्याने माणूस लहान होतो असं नाही”, असं भास्कर जाधव म्हणाले.