वटवृक्ष मंदिरातील वर्षअखेर व नूतन वर्षाचे कार्यक्रम रद्द, भाविकांना स्वामी दर्शनासाठी मंदीर मात्र चालू राहणार
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२६ : नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यात व देशात कोरोना ओमीक्रॉन व्हेरिएंटने आपला संसर्ग विस्तार वेगाने वाढवण्याचे लक्षण दाखवित आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट स्वामी महाराज मंदिरात सरत्या वर्षाला निरोप व नूतन वर्षाचे स्वागत समारंभाचे विविध धार्मिक कार्यक्रम प्रशासनाच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.
कोरोना ओमीक्रॉन व्हेरीएंटच्या पार्श्वभूमीवर नाताळच्या सुट्टया व नूतन वर्षाचा कालावधी आलेला आहे. राज्यात व देशभरात कोरोना ओमीक्रॉन व्हेरिएंट संसर्ग हळूहळू वाढत असल्याचे निदर्शनास येत असल्याने प्रशासनाने कोल्हापूर, मुंबई, पुणे येथील भजनी मंडळाच्यावतीने थर्टी फस्ट व नुतन वर्षाच्या मुहूर्तावर मंदिरात साजरे होणारे धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याची सूचना दिलेली आहे. त्याची दखल घेऊन कोल्हापूर, पुणे, मुंबई येथील भजनी मंडळाच्या वतीने ३१ डिसेंबर व नूतन वर्षाच्या मुहूर्तावर भजन, सोंगी भारुड, नूतन वर्षाचा जल्लोष इत्यादी धार्मिक कार्यक्रम प्रशासनाच्या सुचनेनुसार रद्द करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला असल्याचे सांगितले.
धार्मिक कार्यक्रम जरी रद्द झाले असले तरी नाताळ सुट्टया, नूतन वर्षाच्या कालावधीत मंदीर बंद वगैरे होणार नसून चालूच राहणार आहे. नुतन वर्षाच्या मुहूर्तावर स्वामी भक्तांना स्वामींचे दर्शन होणार आहे.तरी भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनेनुसार भाविकांनी सामुहिक गर्दी न करता ठराविक अंतराने टप्प्या-टप्प्याने कोरोना नियमावलीचे पालन करून नाताळ सुट्टयांच्या कालावधीत व नूतन वर्षाच्या मुहूर्तावर स्वामींचे दर्शन घेऊन सुरक्षितपणे माघारी जावून आपले जीवन कृतार्थ करावे,असे आवाहन मंदिर समितीच्यावतीने करण्यात आले आहे.