ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देगाव शाखा कालव्याचे काम पूर्ण करण्यात येणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

मुंबई, दि. 27 : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील देगाव शाखा कालव्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत दिली.

सदर कालव्याचे काम निधीअभावी अपूर्ण असल्याबाबतचा तारांकित प्रश्न आज प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभा सदस्य सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी यांनी उपस्थित केला होता.

श्री. पाटील म्हणाले की, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंचनाचा सेतू असलेल्या देगाव शाखा कालव्याच्या कामाला 20 वर्षे झाली असली तरी याकाळात भूसंपादन करण्याबरोबरच अतिक्रमण हटविण्याचे काम करण्यात आले आहे. आता या कालव्याचे 50 टक्क्यांहून जास्त काम पूर्ण झाले असून या कामासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.  भीमा (ऊजनी) प्रकल्पास 2 हजार 622 कोटी रुपयांची तृतीय सुधारीत प्रशासकीय मान्यता 8 मार्च 2019 रोजी देण्यात आली आहे. यामध्ये देगाव शाखा कालव्याच्या उर्वरित कामासाठी 476.64 कोटी रुपये तरतूद अंतर्भूत आहे. आतापर्यंत देगाव कालव्यावर 174.90 कोटी रुपये खर्च झाला आहे. भीमा (ऊजनी) प्रकल्पासाठी सन 2021-22 साठी 70 कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच निधीच्या उपलब्धतेनुसार देगाव शाखा कालव्याचे काम जून 2024 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!