अक्कलकोट, दि.३ : गावात झालेल्या
चोरीचा धडा घेऊन चपळगाव ग्रामपंचायतीने गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आणि तो प्रत्यक्षात साकारलाही.त्याचे काम आता पूर्णत्वास गेल्याने
गावातील मुख्य चौक आता सीसीटीव्हीच्या कक्षेत आले आहेत.त्यामुळे गावातील गैरप्रकारांना आळा बसणार आहे.
सरपंच उमेश पाटील व पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.यासाठी बालाजी अमाईन्सचे प्रमुख राम रेड्डी यांनी सीएसआर फंडातून
मदत केली आहे.वास्तविक पाहता ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि त्याचा वापर होणे खूप अवघड असते.गावचे भौगोलिक क्षेत्रफळ कमी असल्याने बाजार गल्ली,ग्रामपंचायत,डिसीसी बँक,सोनार गल्ली व बस स्टँड परिसरात हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
सहा महिन्यापूर्वी चपळगाव येथे चार ते पाच लाख रुपयांची मोठी चोरी झाली होती.त्यावेळी पाच ते सहा घरे चोरट्याने
फोडली होती.केवळ सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे या चोरीचा तपास लागला नव्हता.तेंव्हापासून ग्रामस्थांमध्ये
भीतीचे वातावरण होते.या परिस्थितीचा विचार करून सरपंच पाटील यांनी राम रेड्डी यांची भेट घेतली आणि सीएसआर फंड गावाला देण्याची विनंती केली होती.
त्यानुसार रेड्डी यांनी तात्काळ होकार देऊन या उपक्रमाला सहकार्य केले.गावात सध्या प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.गावपातळीवर अशा प्रकारे कॅमेरे बसविणारे चपळगाव हे अक्कलकोट तालुक्यातील पहिले गाव ठरले आहे.मध्यंतरी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी देखील उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांना लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले होते.त्या आवाहनाला प्रतिसाद देत चपळगाव ग्रामपंचायतीने उचललेले पाऊल निश्चितच स्वागतार्ह
आहे.
लवकरच सीसीटीव्हीचे
लोकार्पण
गावात सहा महिन्यापूर्वी चोरीची मोठी घटना घडली होती अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये आणि जर दुर्दैवाने घडल्या तर त्याचा तपास तातडीने लागला पाहिजे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम हाती घेतला आणि तो प्रत्यक्षात साकारला. लवकरच पोलिस अधीक्षकांच्या
हस्ते याचे उद्घाटन केले जाणार आहे.
उमेश पाटील,सरपंच
तपास कामात
मदत होईल
चपळगाव ग्रामस्थांनी घेतलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. मी ग्रामस्थांचे मनापासून अभिनंदन करतो.आम्ही देखील ज्यावेळी अक्कलकोट शहरात कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी ग्रामीण भागातील नागरिकांना या संदर्भात आवाहन केले होते.याचा फायदा निश्चितच तपास कामात होईल.
अनंत कुलकर्णी,पोलिस निरीक्षक
अक्कलकोट