सचिन पवार
कुरनूर,दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे देविदास काळे यांच्या शेतातील तीन एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली.
ही घटना दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली. प्रत्यक्षदर्शी आणि आसपासच्या शेतकऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली असता शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समजले. तत्पूर्वी अमर पाटील यांच्या शेतातील दोन तारांच्या घर्षणाने ही आग लागल्याचे समजते.काळे यांच्या शेतात ऊस असल्याने वाऱ्याच्या दिशेने ही आग त्यांच्या शेताकडे सरकली आणि आग लागली.काही वेळानंतर शेतकऱ्यांना व नागरिकांना आग विझवण्यात यश आले.परंतु वर्षभर केलेले कष्ट वाया गेले आहे, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
या आगीत पूर्णपणे ऊस जळून खाक झाले आहे.यात तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन आम्हाला मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.आग विझवण्यासाठी राम शिंगटे,सतीश शिंदे, संभाजी मोरे, मधू चौधरी, भागवत खांडेकर, दिगंबर पाटील आदी युवकांनी मोलाचे सहकार्य केले.