अक्कलकोट, दि.२२ : यंदाच्या गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना एफआरपी नुसार रक्कम अदा करण्यात धोत्री (ता. दक्षिण सोलापूर ) येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज या कारखान्याने सोलापूर जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. या कारखान्याच्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना १५ डिसेंबर पर्यंतची बिले अदा करण्यात आली आहेत.
गोकुळ शुगरने जिल्ह्यात सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रति टन दोन हजार रुपये प्रमाणे एफआरपीच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा केली होती. त्यानंतर एफआरपी कायद्यानुसार कारखान्याला ऊस पुरवठा केल्यानंतर १५ दिवसांच्या आत बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नियमितपणे जमा करण्याची परंपरा गोकुळ शुगर कारखान्याने यंदाच्या हंगामात सुरू केली आहे.
१५ डिसेंबर पर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या रकमा डिसेंबर अखेर जमा केल्या आहेत. साखर आयुक्तांनी एफआरपीची रक्कम अदा करणाऱ्या राज्यातील साखर कारखान्याची उतरत्या क्रमाने यादी प्रसिद्ध केली आहे त्यात धोत्रीच्या गोकुळ शुगरने सोलापूर जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे तर राज्याच्या यादीत या कारखान्याचा १४ वा क्रमांक असल्याचे यादीतून स्पष्ट झाले आहे. तोडणी व वाहतूक यंत्रणांच्या रकमा वेळोवेळी अदा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी दिली.
गोकुळ शुगर कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता प्रतिदिन ३ हजार ५०० मेट्रिक टन आहे. मात्र सध्या कारखाना प्रतिदिन ६ हजार मेट्रिक टन क्षमतेने सुरू आहे. १५ मार्चपर्यंत गाळप हंगाम सुरू राहणार असून ६ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. कारखान्यांचा सरासरी साखर उतारा जिल्ह्यात उत्तम आहे,असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांचे बिल खात्यावर जमा
गोकुळ शुगर्सने चालू गळीत हंगामातील ऊस बीलापोटी आतापर्यंत ४९ कोटी ३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. कारखाना सुरू राहील तोपर्यंत शेतकऱ्यांच्या ऊस बिलाच्या रकमा वेळच्या वेळी मिळत राहतील. कसलीही अडचण राहणार नाही – दत्ता शिंदे , चेअरमन, गोकुळ शुगर इंडस्ट्रीज धोत्री