अक्कलकोट,दि.४ : सध्या सूर्यनारायणाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे सर्वत्र लाही लाही होत आहे.आग ओकणाऱ्या सूर्यनारायणाचा प्रकोप शांत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याची गरज आहे,असे प्रतिपादन दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामी यांनी केले.
अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे अक्षय्यतृतीयेनिमित्त महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री बसव प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या शिबिरात १२६ जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती म.नि. प्र. डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामी यांच्या हस्ते दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मल्लिनाथ येगदी,उपाध्यक्ष उमेश सावळसूर,भीमाशंकर अल्लापूर, विश्वनाथ गंगावती, बसवराज बिदनूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.प्रारंभी मंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीत महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार करण्यात आले. यावेळी सोलापुरातील डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे डॉ. हरिश्चंद्र गलियाल, जनसंपर्क अधिकारी दिलीप बनसोडे, सुनील हरारे अंबण्णा निंबाळ, बसवराज कौलगी आदी उपस्थित होते.यावेळी सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी मनोगत व्यक्त करताना मंडळाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. रक्त संकलन करण्यासाठी डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे अमृता चव्हाण, दीपा कुलकर्णी, संगीता मेंथे, सौख्या देसाई, अनिल जांबळे, पार्वती कोळी, नीलम्मा हेगडे, गणेश दोंता, राहुल म्हस्के आदींनी सहकार्य केले. प्रस्ताविक व सूत्रसंचालन संतोष जोगदे तर गुरुशांत माशाळ यांनी आभार मानले.