ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जेऊरच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात २२ जोडपी विवाहबद्ध

मारुती बावडे

अक्कलकोट,दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील श्री काशिलिंग बहुद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात २२ जोडपी विवाहबद्ध झाली. दरवर्षी या विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते.कोरोनामुळे खंड पडला होता. यावर्षी पुन्हा नव्या जोमाने जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील व मित्र परिवाराने या विवाह सोहळ्याचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली.विवाह सोहळ्याचे हे पाचवे वर्ष आहे. प्रारंभी वऱ्हाडी मंडळींचे संस्थेच्यावतीने स्वागत करण्यात आले.सायंकाळी हजारो वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीत गोरज मुर्हूर्तावर हा विवाह सोहळा पार पडला.यावेळी वधू-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी जेऊर,नागणसुर,शिरवळ,मैंदर्गी,हुबळी आदीसह विविध मठांचे मठाधिश यांच्यासह काशीपीठाचे उत्तराधिकरी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, माजी आमदार
सिध्दाराम म्हेत्रे,गटविकास अधिकारी सचिन खुडे,अशपाक बळोरगी,दिलीप सिद्धे,
सिद्धार्थ गायकवाड,सद्दाम शेरीकर,व्यंकट मोरे, नागनाथ सुरवसे,शिवाजी कलमदाणे, सुरेश सोनार,महांतेष पाटील,काशीराया काका पाटील,विलास गव्हाणे आदी उपस्थित होते. होटगी पिठाचे डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांची काशीपीठ उत्तराधिकारी निवड झाल्याबद्दल त्यांचा तुलाभार कार्यक्रम व सन्मान सोहळा पार पडला.मान्यवरांचा सत्कार अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी बोलताना पाटील यांनी विवाह सोहळयात मागील वर्षी सहभागी झालेल्या दांपत्याला पहिली मुलगी झाले असल्यास त्या मुलींचे नांवे संस्थेच्यावतीने ‘ कन्यारत्न ‘ योजनेतंर्गत पाच हजाराचा धनादेश देण्यात येणार आहे,असे सांगितले.डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, माजी आमदार म्हेत्रे,अशपाक बळोरगी यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास जेऊरसह विविध गावचे सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे आजी-माजी अध्यक्ष,उपाध्यक्ष,संचालक तसेच जेऊरसह अक्कलकोट तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.या सोहळ्याचे सूत्रसंचालन तुकाराम दुपारगुडे व शंकर अजगोंडा यांनी केले.आभार काशीराया काका पाटील यांनी आभार मानले.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

 

उत्तम व्यवस्था
अन नेटके नियोजन

या सोहळ्यात वऱ्हाडी मंडळीसाठी स्नेहभोजनांची उत्तम व्यवस्था सकाळपासूनच करण्यात आली होती.यावेळी संयोजन समितीतर्फे वधूस मणी-मंगळसूत्रसह सौभाग्य अंलकार,शालू तसेच नवरदेवास सफारी पोषाखासह दोन्ही वधू-वरांस हळदीचे कपडे देण्यात आले.अक्षतापूर्वी वधू-वरांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!